पाकिस्तानने अटारी-वाघ सीमेवर जवानांना दिली मिठाई
वृत्तसंस्था/ अमृतसर
पाकिस्तानच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी पाक रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवान आणि अधिकाऱयांना अटारी-वाघा सीमेवरील संयुक्त तपासणी नाक्यावर मिठाई प्रदान केली आहे. यादरम्यान काही क्षणांसाठी दोन्ही सीमांमधील गेट खुले करण्यात आले आणि लाइन झिरोवर या कार्यक्रमाचे आयोजन झाले. तर भारताकडून आज पाकिस्तान रेंजर्सना मिठाई देण्यात येणार आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी सकाळी बीएसएफच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून स्वतःच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा म्हणून मिठाई देण्याची इच्छा व्यक्त केली. बीएसएफच्या अधिकाऱयांनी ही इच्छा मान्य केली. त्यानंतर पाक रेंजर्सच्या अधिकाऱयांनी सकाळी 9.45 वाजता बीएसएफचे कमांडेंट जसबीर सिंह यांना मिठाई प्रदान केली आहे.
भारताकडून 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला मिठाई प्रदान करत शांततेचा संदेश देण्यात येणार असल्याचे जसबीर सिंह यांनी सांगितले आहे. होळी, दिवाळी, ईद, वैशाख, 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी पाक रेंजर्स आणि बीएसएफ दरम्यान संबंध सुधारण्यासाठी मिठाईंचे आदान-प्रदान होत असते.









