भारतविरोधी 20 युटय़ूब चॅनेल्सवर बंदी – 2 संकेतस्थळांवरही ऍक्शन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानातून ऑपरेट केली जाणारी 20 युटय़ूब चॅनेल्स आणि 2 संकेतस्थळांवर केंद्र सरकारने मंगळवारी बंदी घातली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातून संचालित होणारी ही चॅनेल्स आणि वेबसाईट्स भारताशी संबंधित संवेदनशील मुद्दय़ांवर फेक न्यूज (बनावट वृत्त) फैलावत होते, असे सरकारकडून सांगण्यात आले.
इंटरनेटवर काश्मीर, भारतीय सैन्य आणि भारतातील अल्पसंख्याकांची स्थिती, राम मंदिर आणि जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना इत्यादी मुद्दय़ांवर ही युटय़ूब चॅनेल्स आणि वेबसाईटस फेक न्यूज पोस्ट करत होती. द पंच लाइद, इंटरनॅशनल वेब न्यूज, खालसा टीव्ही, द नेकेड ट्रूथ यांचा या बंदी घातलेल्या युटय़ूब चॅनेल्समध्ये प्रामुख्याने समावेश आहे.
बंदी घातलेली युटय़ूब चॅनेल्स
द पंच लाइन, इंटरनॅशनल वेब न्यूज, खालसा टीव्ही, द नेकेड ट्रूथ, 48 न्यूज, काल्पनिक, हिस्टोरिकल फॅक्ट, पंजाब व्हायरल, नवा पाकिस्तान ग्लोबल, कव्हर स्टोरी, गो ग्लोबल, ई-कॉमर्स, जुनैद हलीम ऑफिशियल, तैयब हनीफ आणि जेन अली ऑफिशियल या युटय़ूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.
लाखो सब्सक्राइबर्स
पाकिस्तानातून संचालित होणाऱया नया पाकिस्तान ग्रुपकडे (एनपीजी) युटय़ूब चॅनेल्स एक नेटवर्क आहे. याचबरोबर काही अन्य युटय़ूब चॅनेल्स देखील आहेत, पण त्यांचा एनपीजीशी कुठलाच संबंध नाही. या चॅनेल्सकडे सुमारे 35 लाख सब्सक्राइबर्स आणि 55 कोटी व्हिडीओ ह्यूज आहेत. काही युटय़ूब चॅनेल्सना पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचे अँकर्सच चालवत होते.
दोन वेगवेगळे आदेश जारी
याप्रकरणी सरकारकडून दोन वेगवेगळे आदेश जारी करण्यात आले आहेत. पहिला आदेश 20 युटय़ूब चॅनेल्स आणि दुसरा 2 संकेतस्थळांसाठी आहे. या युटय़ूब चॅनेल्स आणि संकेतस्थळांना ब्लॉक करण्यास इंटरनेट सेवा प्रदात्यांना सांगण्यात आले असल्याचे दूरसंचार विभागाकडून म्हटले गेले. या युटय़ूब चॅनेल्स आणि संकेतस्थळांकडून केल्या जाणाऱया दुष्प्रचारामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे त्यांच्यावर नजर ठेवणाऱया गटाला आढळून आले. भारताच्या विरोधात दुष्प्रचार करण्याच्या पाकिस्तानच्या कटांतर्गत फेक न्यूजचा भडिमार करण्यात येत होता. याचमुळे कारवाई आवश्यक ठरल्याचे सरकारचे म्हणणे आहे.









