दुसरी आणि शेवटची कसोटी आजपासून, सजीव खेळपट्टीसाठी प्रयत्न
वृत्तसंस्था/ कराची
सोमवारपासून येथे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीला प्रारंभ होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्याने हे दोन्ही संघ आता मालिका विजयासाठी सज्ज झाले आहेत.
2022 च्या क्रिकेट हंगामात पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी अत्यंत निराशजनक झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षाची प्रारंभी कसोटी मालिका विजय हस्तगत करण्यासाठी दोन्ही संघ आतुरलेले आहेत. उभय संघातील झालेल्या पहिल्या सामन्यात पाकचा कर्णधार बाबर आझमने डावाची घोषणा लवकरच करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता आणि या सामन्यातील गेल्या शुक्रवारी शेवटच्या दिवशीच्या एक तासाच्या कालावधीत पाकने न्यूझीलंडला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते पण न्यूझीलंडने 8 षटकात 1 बाद 61 धावा जमवल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतल्याने ही कसोटी अनिर्णित राहिली होती. पीसीबीने यापुर्वी या मालिकेतील दोन्ही सामने कराचीमध्ये खेळवण्याचा आग्रह धरला होता कारण मुलतानमधील हवामानाची समस्या निर्माण झाली होती आणि तेथे दाट धुक्के बराचवेळ राहत असल्याने खेळामध्ये अडथळा येऊ शकतो या उद्देशाने पीसीबीने हे दोन्ही सामने कराचीत खेळवण्यासाठी आग्रह केला होता. उभय संघातील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. तत्पुर्वी दोन्ही संघांनी कसोटी क्रिकेटमध्ये सलग चार सामने गमावले होते. ही पराभवाची मालिका अनिर्णित सामन्याने खंडित झाली आहे. इंग्लंड संघाकडून यजमान पाकला कसोटी मालिकेत 3-0 अशा एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच न्यूझीलंडला इंग्लंडकडून कसोटी एकतर्फी गमवावी लागली होती. गेल्या महिन्यात पाक संघाला इंग्लंडकडून कसोटी मालिकेत एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेसाठी खेळपट्टय़ा पाटा होत्या आणि या खेळपट्टय़ांवर अधिक धावा जमवल्या गेल्या होत्या. गोलंदाजांना या खेळपट्टय़ांवर फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही.

आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाकचा संघ सध्या सातव्या स्थानावर असून न्यूझीलंडचा संघ आठवय़ा स्थानावर आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसीच्या या पहिल्याच स्पर्धेमध्ये न्यूझीलंडने विजेतेपद मिळवताना अंतिम सामन्यात लॉर्डस् मैदानावर भारताचा पराभव केला होता. पाक संघाच्या खराब कामगिरीमुळे पीसीबीने कर्णधाराची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून कसोटी मालिकेत पाकला व्हाईट वॉश मिळाल्यानंतर पीसीबीने चेअरमन रमीज राजाची हकालपट्टी केली. दरम्यान पीसीबीचे माजी चेअरमन नजम सेठी यांच्याकडे पीसीबीच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीचे प्रमुख पद सोपविण्यात आले.
पाकचा कर्णधार बाबर आझम याची 2022 च्या क्रिकेट हगामातील कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली आहे. त्याने या कालावधीत 9 कसोटी सामन्यात 1184 धावा जमवल्या असून त्यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे. मात्र पाक संघातील अन्य काही महत्त्वाचे फलंदाज सूर मिळवण्यासाठी झगडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पाक संघातील आणखी एक नवोदित फलंदाज शकीलने समाधानकारक कामगिरी केली असून त्याने इंग्लंडविरुद्धच्या रावळपिंडीतील सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले होते. त्याने 4 कसोटी सामन्यात 5 अर्धशकते नोंदवली आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शकीलने नाबाद 55 धावा जमवत पाकला संभाव्य पराभवापासून वाचविले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या सोधीने पाकच्या दुसऱया डावात 6 गडी बाद केले होते. गेल्या चार कसोटी सामन्यात पाकची मधली फळी झटपपट बाद होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन सामन्यात पाकची फलंदाजी कोलमडली होती. तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या नोंदवता आली नाही. बलाढय़ आणि दर्जेदार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध आपल्या संघाला खेळण्याची संधी उपलब्ध झाल्याने संपूर्ण पाक संघाला पुरेसा अनुभव मिळत असल्याचे कर्णधार बाबर आझमने म्हटले आहे.
घरच्या मैदानावर होत असलेल्या कसोटी सामन्यांसाठी निर्जीव आणि कोरडय़ा खेळपट्टय़ा बनवल्या जात असल्याने पीसीबीवर टीका होत आहे. रावळपिंडीची खेळपट्टी संपूर्ण निर्जीव असून आयसीसीकडून या खेळपट्टीला दोन गुण मिळाले. या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धचे सामने खेळवले गेले पण पीसीबीच्या नव्या पदाधिकाऱयांनी कराचीच्या खेळपट्टीबाबत बरेच परिश्रम घेतले आहेत. ही खेळपट्टी फलंदाजीला तसेच गोलंदाजीलाही अनुकूल राहिल, अशी आशा पाकचे निवड समिती प्रमुख शाहिद आफ्रिदी यांनी व्यक्त केली आहे. शाहिद आफ्रिदीने खेळपट्टी बनवणाऱया क्युरेटरबरोबर गेले दोन दिवस राहून खेळपट्टीचे निरीक्षण करीत आहेत. निर्जीव खेळपट्टय़ाबाबत आफ्रिदीने टीका केली आहे. या खेळपट्टय़ांवर थोडे गवत ठेवण्याचा सला त्यांनी दिला आहे. आता उभय संघातील दोन सामन्याची कसाटी मालिका संपल्यानंतर कराचीच 9 ते 13 जानेवरी दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.









