ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
सामूहिक बलात्कार प्रकरणी लाहोर न्यायालयाने प्रथमच ऐतिहासिक निकाल दिला आहे. मागील वर्षी पाकिस्तानी वंशाच्या एका फ्रेंच महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेतील दोन आरोपींना लाहोर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याची ही पाकिस्तानमधील पहिलीच केस आहे.
पाकिस्तानात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लाहोरजवळ एक महिला महामार्गावर उभी होती. पाकिस्तानी वंशाच्या या फ्रेंच महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली होती. त्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी इम्रान सरकारला नवा कायदा करावा लागला.









