ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानमधील बहावलनगरमध्ये गुरूवारी शिया समुदायाच्या मोहरम मिरवणुकीत बॉम्बस्फोट झाला. स्थानिक मिडीयाकडून मिळलेल्या माहितीनुसार, यामध्ये तीनजण ठार झाले असून 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. बॉम्ब स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाली. या स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या बॉम्बस्फोटानंतर शहरात तणाव निर्माण झाला असून शिया समुदायाशी संबंधित लोकांनी या हल्ल्याविरोधात आणि दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
पुलिस अधिकारी मोहम्मद असद आणि शिया नेते खावार शाफकात यांनी या बॉम्बस्फोटबाबत पुष्टी केली आहे. ते म्हणाले, मिरवणूक संकरे मुहाजिर कॉलनीजवळून जात असताना हा स्फोट झाला. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारने अशा प्रकारच्या मिरवणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.