पाकिस्तानी अभिनेत्रीचा नरेंद्र मोदींविरोधात तक्रारीचा सूर , सेहर शिनवारीने मागवली दिल्ली पोलिसांची ऑनलाईन लिंक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, इस्लामाबाद
पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार करायची आहे. सेहरने ट्विट करून दिल्ली पोलिसांची ऑनलाईन लिंक मागितली. यावर दिल्ली पोलिसांनी मजेशीर उत्तर दिले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीने ट्विट करून दिल्ली पोलिसांचा नंबर मागितला आणि तिला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार नोंदवायची आहे, असे म्हटल्यानंतर दिल्ली पोलिसांनी रिट्विट करत चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने ट्विट करत पाकिस्तानमध्ये अराजकता आणि दहशतवाद पसरवणाऱ्या भारतीय पंतप्रधान आणि भारतीय गुप्तचर संस्थेविरोधात तक्रार दाखल करायची आहे, असे म्हटले होते. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार सुरू झाला असताना मंगळवारी रात्री 10.26 वाजता सेहर हिने ट्विट केले. कोणाला दिल्ली पोलिसांची ऑनलाईन लिंक माहित आहे? मला तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुप्तचर एजन्सी रॉ यांच्याबद्दल तक्रार करायची आहे, हे लोक माझ्या देशात दहशतवाद पसरवत आहेत. जर भारताचे सर्वोच्च न्यायालय दाव्याप्रमाणे स्वतंत्र असेल तर तिथे न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे, असे सेहरने ट्विटरवर म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांचे ‘सीमापार’ उत्तर
सेहरच्या ट्विटनंतर केवळ 31 मिनिटांतच दिल्ली पोलिसांनी सेहरला टॅग करत प्रत्युत्तर दिले. ‘पाकिस्तान अजूनही आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही’ असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. तसेच तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्विट करत आहात, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.









