इम्रान खान यांच्या पक्षाच्या फलकावर सैन्यप्रमुखांचे छायाचित्र
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
कारगिल युद्धादरम्यान मी पंतप्रधान असतो आणि सैन्यप्रमुखांनी मला न सांगता युद्ध सुरू केले असते, तर त्वरित त्यांना बडतर्फ केले असते असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. आयएसआयचा एखादा प्रमुख मला राजीनामा देण्यास सांगत असल्यास वेळ न दवडता त्यालाच हटविण्याचा निर्णय घेतला असता, असेही इम्रान यांनी म्हटले आहे.
तर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्सान यांच्या पक्षाच्या फलकांवर आता सैन्यप्रमुख जनरल बाजवा तसेच अन्य सैन्याधिकारी झळकले आहेत. यातून सैन्याचा इम्रान यांच्यावरील वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानातील विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. नवाज शरीफ यांच्यासह विरोधी पक्षांचे सर्व नेते इम्रान खान यांना सैन्याच्या कृपेने झालेले पंतप्रधान संबोधित आहेत. इम्रान यांना इलेक्टेड ऐवजी सिलेक्टेड पंतप्रधान म्हणू जाऊ लागले आहे.
1199 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध झाले होते. या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला होता. तेव्हा नवाज शरीफ हे पंतप्रधान आणि जनरल परवेझ मुशर्रफ हे सैन्यप्रमुख होते. मुशर्रफ यांनी माझी अनुमती न घेताच कारगिल युद्ध सुरु केले होते आणि अमेरिकेच्या मदतीने हे युद्ध थांबवून पाकिस्तानला वाचविल्याचे नवाज यांनी अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे. इम्रान याला नवाज यांचा कमकुवतपणा ठरवू लागले आहेत.
2014 मध्ये आयएसआय प्रमुख जहीर उल इस्लाम यांनी मध्यरात्री एका व्यक्तीद्वारे संदेश पाठविला होता. या संदेशात त्वरित राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्याला नकार दिल्याचा दावा नवाज यांनी केला आहे. यावरही इम्रान यांनी नवाज यांना लक्ष्य केले आहे.
सैन्यावरून पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकारणादरम्यान फलक झळकले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान यांच्यासोबत फलकावर सैन्यप्रमुख बाजवा आणि अन्य सैन्याधिकारी दिसून आले आहेत. काही लोकांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता हे फलक हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









