इंजेक्शन्स, अत्यावश्यक औषधांची अनेक रुग्णालयांमध्ये टंचाई
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटाचा चटका आता आरोग्य सेवा व्यवस्थेपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांना अत्यावश्यक औषधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अन्य देशांमधून येणाऱया आवश्यक औषधी घटकांची (एपीआय) आयात बरीच कमी झाली आहे. परिणामतः अनेक रुग्णालयात शस्त्रक्रियाही खोळंबल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकंदर नजिकच्या काळात ही समस्या आणखी गंभीर बनल्यास पाकिस्तानला मोठय़ा वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
औषधांचा तुटवडा आणि ते बनवण्यासाठी लागणाऱया घटकांमुळे औषध कंपन्यांनी औषधांचे उत्पादन संथगतीने सुरू असल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये फक्त दोन आठवडय़ांचा ऍनेस्थेसियाचा साठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. औषधांच्या तुटवडय़ामुळे केवळ रुग्णांवरच नाही तर अनेकांच्या रोजगारावरही परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
औषध उत्पादकांनी अर्थव्यवस्थेला दोष देताना व्यावसायिक बँकांनी औषधाच्या आयातीसाठी कर्ज न दिल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानातील सुमारे 95 टक्के औषधी उत्पादने आयातीवर अवलंबून आहेत. चीन आणि भारतातूनही मोठय़ा प्रमाणात औषधी घटकांची आयात केली जाते. परंतु बँकांकडून कर्ज प्राप्त न होणे, पाकिस्तानच्या चलनाचे अवमूल्यन आणि परकीय चलनसाठा घटल्यामुळे पाकिस्तानी औषध उत्पादकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.









