महाराष्ट्रात भेटली आई : खरं नाव राधा वाघमारे असल्याचे कुटुंबाचे म्हणणं : डीएनए चाचणी होणार
वृत्तसंस्था / इंदोर
5 वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आलेली दिव्यांग (मूकबधीर) गीताला तिची आई सापडली आहे. महाराष्ट्राच्या औरंगाबादमधील वाजुल येथे राहणाऱया मीना पांद्रे यांनी गीता ही आपली मुलगी असल्याचे म्हटले आहे. गीताचे खरे नाव राधा वाघमारे असून तिचे वडील आता हयात नाहीत असे मीना यांनी सांगितले आहे. मीना यांनी पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह केला आहे.
मीना पांद्रे स्वतःच्या कुटुंबासोबत गुरुवारी गीताला भेटली आहे. मीनानुसार तिच्या मुलीच्या पोटावर भाजल्याची खुण होती. गीताच्या पोटावरही भाजल्याची खुण आहे. पण अद्याप दोघांचीही डीएनए चाचणी करविण्यात आलेली नाही. चाचणी आणि अन्य कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केल्यावरच गीताला सोपविण्यात येणार आहे.
11 व्या वर्षी पोहोचली पाकिस्तानात
पाकिस्तानातील एका रेल्वेस्थानकावर गीता वयाच्या 11-12 वर्षांदरम्यान सापडली होती. पाकिस्तनच्या ईधी वेलफेयर ट्रस्टने तिचा सांभाळ केला होता. 26 ऑक्टोबर 2015 रोजी तत्कालीन विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकारावर गीताला पाकिस्तानातून भारतात आणले गेले होते. तेव्हा तिला इंदोरच्या मूकबधिराच्या संस्थेत ठेवण्यात आले होते. येथूनच तिच्या कुटुंबाचा शोध सुरू करण्यात आला. गीता मूकबधीर असून ती शिकलेली नव्हती. अशा स्थितीत तिच्याकडून माहिती मिळवणे अवघड ठरले होते.
हातखुणांनी नदी अन् शेतांचा उल्लेख
गीताने बालपणाच्या धुसर आठवणींच्या आधारावर तिच्या घरानजीक एक नदी तसेच ऊसाची शेती होती असे हातांच्या खुणांद्वारे सांगितले होते. याचबरोबर तेथे रेल्वेमार्ग होता. हा तपशील महाराष्ट्राच्या मराठवाडय़ातील भागाच्या काही स्थानांशी मिळताजुळता असल्याचे इंदोरच्या आनंद सर्व्हिस सोसायटीच्या ज्ञान पुरोहित यांनी सांगितले आहे.
24 दाम्पत्यांचा दावा ठरला फोल
26 ऑक्टोबर रोजी गीताला इंदोर येथे आणले गेल्यावर देशभरातील अनेक दाम्पत्यांनी तिचे आईवडील असल्याचा दावा केला होता. पण कुणाचाच डीएनए जुळला नव्हता. तरीही तिच्या आईवडिलांचा शोध सुरूच राहिला. सध्या गीता महाराष्ट्राच्या परभणी येथे राहत आहे. पाकिस्तानच्या ईधी वेलफेयर ट्रस्टचे माजी प्रमुख दिवंगत अब्दुल सत्तार ईधी यांच्या पत्नी बिल्किस ईधी यांनाही गीताचे कुटुंब भेटल्याची माहिती देण्यात आली आहे.









