ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन फेक न्यूज आणि भारतविरोधी बातम्या पसरवणारी आणि पाकिस्तानातून ऑपरेट होणारी अकाऊंट ब्लॉक करण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सहाय म्हणाले, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन फेक न्यूज आणि भारतविरोधी बातम्या पसरविण्यात येतात. भारताचे माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूशी संबंधित खोटय़ा बातम्यांचा प्रसारही मेठय़ा प्रमाणात करण्यात आला. त्यानंतर गुप्तचर विभाग या सोशल मीडिया अकाऊंटवर बारीक लक्ष ठेवून होता. त्यांची कार्यप्रणाली संशयास्पद आढळल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचा प्रस्ताव मंत्रालयासमोर ठेवण्यात आला.
त्यानंतर 35 यू-टय़ूब चॅनेल्स, दोन ट्विटर अकाउंट्स, दोन इन्स्टाग्राम अकाउंट्स, दोन वेबसाईट्स आणि एक फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्याच्या सूचना माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिल्या आहेत. ही सर्व अकाउंट्स पाकिस्तानमधून ऑपरेट होत असून, त्याद्वारे भारतविरोधी बनावट बातम्या पसरवण्याचे काम केलं जात असल्याचे निदर्शनास आलं आहे.