400 हिंदू पोलीस कर्मचारी तैनात : हल्ल्यानंतर घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू मंदिरांवर वाढते हल्ले पाहता सरकारने सुरक्षा वाढविली आहे. सिंधमधील मंदिरांच्या सुरक्षेसाठी 400 हून अधिक हिंदू पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानात मागील काही दिवसांमध्ये अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत.
हल्लेखोरांनी रविवारी सकाळी काशमोर येथील हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला होता. तसेच मंदिराच्या परिसरातील हिंदू धर्मीयांच्या घराच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार देखील केला होता.
तर कराचीमधील मारी माता मंदिर काही लोकांनी बुलडोझरच्या मदतीने पाडविले आहे. हे मंदिर 150 वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. याच्या परिसरात गुप्तधन असल्याच्या कहाण्या स्थानिकांमध्ये प्रचलित असल्याने हा प्रकार केला गेल्याचे मानले जात आहे. मारी माता मंदिराचे व्यवस्थापन मद्रासी हिंदू समुदायाकडे होते.









