जयशंकर-डोवाल यांनी उधळले इम्रान यांचे कट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या (ओआयसी) विदेश मंत्र्यांची बैठक पार पडली. ओआयसीत 57 मुस्लीम देश सदस्य आहेत. यातील सुमारे 16 छोटय़ा देशांचेच विदेशमंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले. अन्य देशांनी राजदूत किंवा कनिष्ठ अधिकाऱयांना पाठविले हेते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अफगाणिस्तानचे शेजारी असलेल्या मध्य आशियातील 5 देशांचे विदेशमंत्री ओआयसी परिषदेला न जाता दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले. या 5 देशांच्या विदेशमंत्र्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली. अशा स्थितीत भारताने ओआयसी परिषद अयशस्वी ठरविल्याचा आरोप पाकिस्तानी प्रसारमाध्यमे करत आहेत.
कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान हे सर्व जण ओआयसीचे सदस्य आहे. या देशांनी पाकिस्तानातील परिषदेत जाण्याऐवजी दिल्लीतील भारत-मध्य आशिया परिषदेला प्राधान्य दिले. भारत आणि मध्य आशियातील पाचही देश अफगाणिस्तानला मदत करू इच्छित असल्याची भूमिका विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मांडल आहे.

पाकिस्तानची फजिती
पाकिस्तानकडून आयोजित ओआयसी बैठकीत तालिबानला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न चालला होता. तर भारतात आयोजित परिषदेचा मुख्य मुद्दा अफगाणिस्तान होता. भारत आणि मध्य आशियातील पाचही देश अफगाणिस्तानची मदत करू इच्छितात, असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारताने उधळला डाव
मागील महिन्यात मध्य आशियाई देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारतात आले होते. त्यानंतर भारताने प्रजासत्ताक दिन सोहळय़ासाठी या देशांच्या अध्यक्षांना निमंत्रित केले. आता इंडिया-सेंटल एशिया समिट झाली असल्याने भारताने अफगाणिस्तानात स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे. जयशंकर आणि अजित डोवाल यांच्या मुत्सद्देगिरीसमोर पाकिस्तानचा पराभव झाला आहे. भारताने एका झटक्यात इम्रान आणि विदेशमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांचे प्रयत्न वाया घालविल्याचे विधान पाकिस्तानचे प्रख्यात पत्रकार कमर चीमा यांनी केले आहे.
पाकिस्तानातील परिषद थट्टेचा विषय
इस्लामाबादमधील ओआयसी परिषद थट्टेचा विषय ठरली. संयुक्त अरब अमिरात आणि कतारचे विदेशमंत्री आले नाहीत. कुठल्याच अरब देशाचा विदेशमंत्री हजर राहिला नाही. केवळ राजदूतांनी भाग घेतला. हे राजदूत पाकिस्तानातच राहत असल्याने त्यांच्या सहभागाला फारसे महत्त्व नसते अशी टिप्पणी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केली आहे.









