आपल्या शेजारी असणारा आणि आपल्याकडे नेहमी वक्रदृष्टीने पाहणाऱया पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. इतकी की या अस्वस्थतेचे रूपांतर अराजकातही होऊ शकेल अशी चिंता तेथील आणि जगभरातील तज्ञ व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानातील अंतर्गत घडामोडी अनेकदा भारतावर परिणाम करणाऱया ठरतात. त्यामुळे तेथील परिस्थितीचा विचार करणे आवश्यक ठरते. काही वर्षांपूर्वी मोठय़ा बहुमतासह त्या देशाचे पंतप्रधानपद पटकावलेले इम्रान खान यांना तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवणे अशक्य होत असल्याची जनतेची भावना होत आहे, हे तेथून येथपर्यंत पोहचणाऱया वृत्तांमधून स्पष्टपणे समजून येते. इम्रान खान यांनी पाक लष्कराने ‘आतून’ केलेल्या साहाय्यामुळे निवडणुकीत विजय मिळविला, हे उघड गुपित आहे. त्यामुळे ते खरे लोकनियुक्त नेते नाहीत, असे तेथील सर्वसामान्य जनतेचे मत होत आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्षही इम्रान खान आणि त्यांच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षाविरोधात एकजूट झाले आहेत. एक वर्षभरात तेथील संसदेची निवडणूक होणार असल्याने इम्रान खान यांचा पराभव करण्याचा चंग त्यांनी बांधल्याचे दिसते. पाकिस्तानच्या या स्थितीला त्या देशाची धोरणे कारणीभूत आहेत. या धोरणांचा एक ‘पॅटर्न’ आहे आणि भारताचा द्वेष हा या पॅटर्नचा एक प्रमुख घटक आहे. हा पॅटर्न समजून घेण्यासाठी इतिहासाचा मागोवा घ्यावा लागतो. 1947 मध्ये त्यावेळच्या ‘अखंड भारता’ची रक्तरंजित फाळणी प्रामुख्याने पाकिस्तानवादी नेत्यांच्या दुराग्रहामुळेच झाली. त्यात मोहम्मद अली जीना आणि त्यांची मुस्लीम लीग व लीगचे इतर नेते हे आघाडीवर होते. मुस्लीमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करण्याचे स्वप्न साकार झाले. त्यावेळी पाकिस्तानात मुस्लीमांची संख्या 80 टक्क्यांहून (आणि आतातर ती जवळपास 95 टक्के असल्याचे सांगण्यात येते) अधिक असली तरी या समाजात भाषा, पंथ, भौगोलिकता यांचा आधार मानणारे अनेक समाजघटक होते आणि आहेत. सिंधी, पंजाबी, काश्मीरी, अफगाणिस्तानला लागून असलेल्या भागातील पख्तून, फाळणीच्या वेळी भारतातून तेथे स्थलांतरीत झालेले मोहाजिर अशा अनेक घटकांमध्ये तो समाज विभागला गेला आहे. शिवाय, शिया, सुन्नी, सुफी हे इस्लामी पंथ आहेतच. तसेच काही प्रमाणात शिल्लक उरलेले हिंदू आणि ख्रिश्चनही तेथे जीव मुठीत धरून रहात आहेतच. या सर्व समाजघटकांच्या स्वतःच्या स्वतंत्र आणि परस्परविरोधी अस्मिता, अपेक्षा आणि समज-गैरसमज आहेत. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर अगदी थोडय़ाच कालावधीत त्या देशातील राजकीय आणि लष्करी क्षेत्रात पंजाबी मुस्लीमांचे वर्चस्व स्थापन झाले, जे आजपर्यंत टिकून आहे. त्यामुळे इतर समाजघटकांना त्यांच्या अघोषित अधिपत्याखाली दबून वावरावे लागते. हे सामाजिक असंतोषाचे प्रमुख कारण आहे. वास्तविक पंजाबी मुस्लीमांची संख्या इतर समजघटकांच्या एकत्रित संख्येपेक्षा बरीच कमी म्हणजे केवळ 15 ते 20 टक्के आहे. मात्र, त्यांच्या हाती पाकिस्तानचे संपत्ती स्रोत, अधिकारपदे, न्यायसंस्था, लष्करी संस्था, उद्योग आदी बहुसंख्येने असल्याने इतर समाजाना निर्णय प्रक्रियेत नगण्य स्थान आहे. विशेषतः पाकिस्तानच्या लष्करात पंजाबी मुस्लीमांचे मोठे वर्चस्व आहे. लष्करच तेथे खरे सत्ताधीश असल्याने सत्तेच्या सर्व क्षेत्रात पंजाब्यांचा बोलबाला आहे. साहजिकच, सिंध, सीमावर्ती प्रांत, पाकव्याप्त काश्मीरचा पाकने बेकायदा बळकावलेला प्रदेश इत्यादी प्रदेशांमधील जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे. या असंतोषाचा अनेकदा भडका उडतो पण तो लष्करी बळावर मुजोरी करून दाबून टाकला जातो. या देशाच्या या तीन प्रांतांमध्ये पाकमधून फुटून स्वतंत्र होण्याची चळवळ केली गेली आहे आणि ती अजूनही होत आहे. अगदी पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हाही खान अब्दुल गफार खान (ज्यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखले जात असे) यांनी त्यांचा पख्तुनबहुल प्रांत पाकिस्तानात विलीन करण्यास नकार दिला होता आणि स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, त्यांना काँगेससह कोणीही पाठिंबा न दिल्याने त्यांचा नाईलाज झाला, असा इतिहास आहे. हे सर्व अंतर्विरोध तेथे आजही जागृत आहेत आणि ते कमी करण्याची क्षमता असणारा एकही नेता तेथे गेल्या 74 वर्षांमध्ये निर्माण झालेला नाही. ‘अल्पसंख्य’ पंजाबी मुस्लीमांचा वरचष्मा त्यामुळे कमी न होता उलट वाढतच गेला. अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांवर कुरघोडी केली की असेच होणार असे पूर्वीपासूनच त्या देशात बोलले जाते. आता हा स्वर अधिक तीव्र होताना दिसतो. याबरोबरच 1980 पासून पाकिस्तानात इस्लामी दहशतवादी संघटना आणि त्यांचे गट-उपगट यांनी उच्छाद मांडला आहे. हे दहशतवादी मुस्लीमांचेही बळी घेण्यास मागेपुढे पहात नाहीत. पाकिस्तानने भारताला संकटात लोटण्यासाठी या दशहतवादी संघटनांना खतपाणी घातले. या संघटनांनी काश्मीर तसेच भारतातील मुंबईसह इतर शहरांमध्ये धुमाकूळ घातला. पण पाकिस्तानलाही तडाखा दिला. सर्वच बाबतीत पाकिस्तान मागे पडला. आज तर तो दहशतवादाचा पाठीराखा देश म्हणून ओळखला जातो. जगाच्या व्यासपीठावर तो एकाकी पडला आहे. तरीही तो सुधारण्याचे नाव घेत नाही. ‘स्वतःचे नाक कापले गेले तरी चालेल, पण दुसऱयाला अभद्र दर्शन झाले पाहिजे’ या म्हणीप्रमाणे पाकची वागणूक आजही आहे. त्यातच इम्रान खान सरकारला अर्थव्यवस्था सांभाळण्यात आलेले अपयश, कोरोनाचे संकट, चीनच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय, पाकिस्तानला दाबून टाकणारा चीनच्या कर्जाचा डोंगर, अनेक मुस्लीम देशांनीही केलेली नाचक्की इत्यादी संकटांमुळे तेथील जनता वैतागलेली असून एक ठिणगी पडल्यास भडका उडू शकेल, अशी स्थिती असल्याचे तिथला मीडिया स्पष्ट करतो. आतल्या आत धुसमत असलेली अस्वस्थता जगाला दिसू नये म्हणून पाकचे लष्करी आणि सरकारी नेतृत्व भारतद्वेषाचा आधार घेते. पण तो आधार यापुढे पुरणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे या देशाला खऱया अर्थाने सुधारावे लागणार आहे. अन्यथा त्या देशातीत अराजक व दहशतवाद वाढीला लागून त्याचा भारतालाही धोका आहे. तसे झाल्यास भारताला कठोर कारवाई करणे भाग आहे. त्यामुळे पाकचा बुडत्याचा पाय अधिक खोलात जाऊ शकतो. आता हे टाळणे त्याच देशाच्या हाती आहे.
Previous Articleराऊतांच्या भावाच्या ऑफिसबाहेर वाझेंची गाडी का होती?
Next Article लिपस्टिक खरेदी करताना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








