संयुक्त अरब अमिरातकडून मोठा निर्णय
वृत्तसंस्था/ अबू धाबी
संयुक्त अरब अमिरातने (युएई) पाकिस्तान समवेत 11 अन्य देशांच्या प्रवाशांसाठी नव्याने व्हिसा प्रदान करण्याची प्रक्रिया सध्या रोखली आहे. या 12 देशांमध्ये भारताचा समावेश नाही. युएई अधिकाऱयांकडून घेण्यात आलेला हा निर्णय कोरोनाच्या दुसऱया लाटेशी संबंधित असावा असे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. परंतु यापूर्वी प्रदान करण्यात आलेला व्हिसा वैध राहणार आहे.
पाकसह युएई सरकारने तुर्कस्तान, इराण, येमेन, सीरिया, इराक, सोमालिया, लीबिया, केनिया आणि अफगाणिस्तानकरता हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युएईने इस्रायलसोबत राजनयिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी कठोर टीका केली होती. इम्रान यांच्या या टीकेमुळे युएईचे नेतृत्व नाराज आहे. याच कारणामुळे पाकिस्तानींना व्हिसा देण्यास युएईने टाळाटाळ सुरू केल्याचे मानले जात आहे. युएईतून हाकलले जाण्याची भीती पाकिस्तानी नागरिकांना सतावू लागली आहे.
युएईत पॅलेस्टाईन समर्थक पाकिस्तानींना अटक करण्यात येत आहे. कायदा अंमलबजावणी संस्थांनी युएईत राहणाऱया सर्वसामान्य पाकिस्तानींकरता अतिरिक्त कठोरपणा दर्शविण्यास सुरुवात केली आहे. या पाकिस्तानींना क्षुल्लक गुन्हय़ांसाठीही अटक करून तुरुंगात डांबण्यात येत आहे.









