ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतो आहे. अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लस टोचून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीचा आलेला साठा दोन दिवसात संपेल. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॅाकडाऊनची मागणी केली आहे. आज याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व पक्षांची चर्चा केली जाणार आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकते. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.








