भारत पाच दशकांहून अधिक काळ पाकिस्तानच्या दहशतवादाशी लढत आहे. छुप्या मार्गाने भारतात दहशतवाद्यांना घुसवून त्यांच्याकरवी दहशतवादी हल्ले करायचे, सतत घातपाती कारवाया करत डिवचायचे व यासाठी पाकव्याप्त काश्मीरच्या भूभागाचा वापर करायचा असे उद्योग पाकिस्तान गेली अनेक वर्षे करीत आहे. राजनैतिक मार्गानेही काही साध्य होत नाही म्हटल्यावर तुलनेने सोपा मार्ग म्हणजे दहशतवाद. म्हणूनच काश्मीरसह देशाच्या अन्य भागात दहशतवादी हल्ले करून अशांतता पसरवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. मुंबई बॉम्बस्फोट, संसद, पठाणकोट, पुलवामा हल्ल्यासह अनेक कारवायांमध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद यापूर्वी सिद्ध झाला. पुलवामा हल्ला आम्हीच केला, अशी कबुली पाकिस्तानच्या एका जबाबदार मंत्र्याने नुकतीच पाकिस्तान संसदेत दिली होती, हे सर्वश्रुत आहे. इतकेच नव्हे तर दहशतवादाची मुळेच पाकिस्तानमध्ये रूजली आहेत, हे आता जगानेच मान्य केले आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी भारतात घुसखोर पाठवण्याच्या पाकिस्तानच्या नापाक प्रयत्नांना भारतीय लष्कराने गुरुवारी चांगलाच तडाखा दिला. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर जैशच्या चार दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीर भागातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात पाक सैनिकांसह अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले ते ट्रकमधून आले होते. घातपाती कारवायांच्या उद्देशाने दहशतवादी शहरात घुसणार असल्याची पक्की खबर गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यामुळेच हा ट्रक अडवण्यात आला व त्यांना यमसदनी पाठवले. हिवाळय़ात पाक सैन्याच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात भारतीय हद्दीमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू होते. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी सुरूवातीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते तळ ठोकतात. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत शिरण्यासाठी पाकिस्तान लष्कर त्यांना पूर्ण मदत करते. यासाठी नियंत्रण रेषेजवळील भारतीय हद्दीतील रहिवासी भागावर गोळीबार करून पाकिस्तान लष्कर या भागात गोंधळ उडवून देते.भारतीय हद्दीत तोफगोळय़ांचा वर्षाव करण्यामागे पाक लष्कराचे दोन उद्देश असतात. एक म्हणजे घुसखोरांना आत शिरण्यासाठी संरक्षण देणे व भारतीय सुरक्षा दलाचे लक्ष विचलित करून ते गोळीबारावर केंद्रीत करणे. जेणेकरून या गोंधळाचा फायदा उठवून दहशतवादी छुप्या मार्गाने भारतीय हद्दीत घुसतील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तोफगोळय़ांच्या माऱयामुळे अनेक भारतीय नागरिक दरवर्षी मारले जातात. या भीतीने या भागातील हजारो नागरिकांनी स्थलांतर केले आहे. भारताच्या दृष्टीने ही कायमची डोकेदुखी बनली आहे. म्हणून एकदाच या विषयाचा निकाल लावण्याची गरज होती. त्यानुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसखोर ज्या ठिकाणी तळ ठोकून बसतात, तो दहशतवाद्यांचा तळ हेरून भारतीय लष्कराने हल्ला केला. या अचूक हल्ल्याला ‘पिन पॉईंंट स्ट्राईक’ असे म्हटले जाते. यापूर्वी पाकिस्तानच्या कारवायांना जेवढय़ास तेवढे भारत उत्तर देत असे. परंतु गुरुवारच्या प्रसंगानंतर भारताने आपली भूमिका बदलल्याचे लक्षात येते. पाकिस्तानच्या कुरापतीला खोलवर आक्रमण करून चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारताने अलीकडे अवलंबले आहे. कोणत्याही युद्धात अशी एक वेळ येते की ज्यावेळी प्रतिपक्षावर न थांबता सतत खोलवर हल्ला करतो तोच अखेर विजयी होतो. हीच ती वेळ आहे पाकिस्तानला मागे रेटण्याची. शत्रूपक्षाच्या डावपेचावरच हल्ला करण्याला युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्त्व दिले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तान जे डावपेच आखत आहे, त्यावर आक्रमक हल्ला करणे गरजेचे आहे. त्या दिशेने भारतीय लष्कराने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करायचा, त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण द्यायचे, भारत हा इस्लामविरोधी देश असल्याचे विष कालवायचे आणि त्यांना भडकवून भारतात हल्ले करण्यासाठी पाठवायचे, ही कूटनीतीच पाकिस्तान वापरत आला आहे. त्याचे परिणामही तो भोगतो आहे. अगोदरच दारिद्रय़ामुळे पाकिस्तानने आत्मप्रतिष्ठा गमावली आहे. कर्जाच्या खाईत अडकलेल्या पाकिस्तानला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी तो जगासमोर कटोरा घेऊन उभा आहे. गेली दोन वर्षे पाकिस्तान फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे लिस्टमध्ये आहे. अवैध मार्गाने पैशाचा गैरवापर व छुप्या मार्गाने दहशतवाद्यांना होणाऱया अर्थपुरवठय़ाला आळा घालण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय संस्था काम करते. पाकिस्तानची वाटचाल आता ब्लॅक लिस्टकडे सुरू आहे. त्यानंतर त्यांचे आर्थिक कंबरडेच मोडणार आहे. दहशतवाद्यांशी असणारे लागेबांधे पाहता या संस्थेने त्यांना पुन्हा फेब्रुवारी 2021 पर्यंत ग्रे लिस्टमध्ये ठेवले आहे. संभाव्य ब्लॅक लिस्टची नामुष्की टाळण्यासाठी पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला गुरुवारी आणखी एका प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा सुनावली हे स्पष्ट आहे. जम्मू-काश्मीरला घटनात्मक दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्यापासून पाकचा तिळपापड झाला आहे. यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर आकांडतांडव करून पाहिले. परंतु चीन वगळता आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांना सपशेल झिडकारले. त्यामुळेच तो पुन्हा एकदा तीव्रतेने दहशतवादाकडे वळला आहे. भारत-पाकिस्ताच्या वादात पाकव्याप्त काश्मीर हाच कळीचा मुद्दा आहे. पाकिस्तान मात्र हा भूभाग भारताच्याच विरोधात दहशतवादी तळांसाठी वापरत आहे. पाकव्याप्त काश्मीरवर अवैध ताबा मिळाल्यानंतर पाकिस्तान आता काश्मीरवरसुद्धा ताबा मागायला उठला आहे. यासाठी आपले अडकलेले बोट सोडवून घेण्याची गरज आहे. त्यामुळे भारताने हा पाकव्याप्त काश्मीरच्याच भूभागाचा निकाल लावून तो परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आक्रमक हालचाली करत आहेत, त्या योग्यच आहेत.
Previous Articleकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








