ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील एका डोंगरावर 1300 वर्षापूर्वीचे भगवान विष्णूंचे मंदिर आढळले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी फजल खालिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
खालिक म्हणाले, स्वात जिल्ह्यातील बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान या मंदिराचा शोध लागला. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिराजवळ छावण्यांचे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेष आणि हिंदू शाही काळातील खुणाही सापडल्या आहेत. तसेच पाण्याचा तलाव आढळून आला आहे.
हिंदू शाही काळातील हिंदूंनी 1300 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते. त्याचे साम्राज्य काबुल खोरे आणि वायव्य भारतावर होते. स्वात जिल्ह्यात यापूर्वी बुद्धांची काही मंदिरे सापडली आहेत. मात्र, हिंदूंचे मंदिर सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.









