संयुक्त राष्ट्रसंघात भारताने सुनावले
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रसंघाकडून घोषित दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पाठिराखा आहे. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन अनेक वर्षांपर्यंत लपून राहिलेल्या आणि अखेरीस अबोटाबादमध्ये मारला गेल्याचा पाकिस्तानने विसर पडू देऊ नये, असे भारताने संयुक्त राष्ट्रसंघात सुनावले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांना पाकिस्तानच्या मुत्सद्दयाने एक डोजियर सोपविले होते. बनावट दस्तऐवज देणे आणि खोटे कथानक रचणे पाकिस्तानसाठी नवी बाब नसल्याचे भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे.
पाकचे मुत्सद्दी मुनीर अकरम यांनी गुतारेस यांची भेट घेत डोजियर सोपवून भारत दहशतवादाला बळ पुरवित असल्याचा आरोप केला होता. याच्या प्रत्युत्तरादाखल ट्विट करत तिरुमूर्ती यांनी अबोटाबाद शहराची आठवण करून दिली आहे. पाकच्या अबोटाबाद शहरात लादेन अनेक वर्षांपर्यंत लपून होता आणि मे 2011 मध्ये अमेरिकेच्या कमांडोंनी त्याचा खात्मा केला होता.