वृत्तसंस्था/ ढाका
यजमान बांगलादेश-पाकिस्तान यांच्यात ढाका येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकचा वेगवान गोलंदाज हसन अलीला शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल आयसीसीने सक्त ताकीद दिली. या प्रकरणाची आयसीसी चौकशी समितीसमोर सुनावणी झाल्यानंतर आयसीसीने हसन अलीला या गुन्हय़ाबाबत सक्त ताकीद दिली.
या सामन्यात बांगलादेशच्या डावातील 17 वे षटक हसन अली टाकत होता. या षटकात बांगलादेशचा नुरुल हसन झेलबाद झाला. यानंतर हसन अलीने काही विचित्र हावभाव केले होते. याची सामनाधिकाऱयांनी गांभीर्याने दखल घेतली.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील हसन अलीकडूनचा हा पहिला गुन्हा असल्याने त्याला ताकीद देऊन या प्रकरणातून मुक्त करण्यात आले. या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने बांगलादेश संघाला 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आता या निर्णयामुळे या संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱया मानधनातील 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.









