बेनझीर यांची कन्या आसिफाही राजकारणात : बंधू बिलावल कोरोनाने संक्रमित
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची कन्या आसिफा हिनेही राजकारणात पाऊल टाकले आहे. आसिफाने मुल्तान येथे आयोजित पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटच्या (पीडीएम) सभेला संबोधित केले आहे. देशाच्या सत्तेवर असलेल्या ‘सिलेक्टेड’ सरकारला घरी पाठविण्याची वेळ आता आली आहे. इम्रान यांना आम्ही सर्व इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड पंतप्रधान मानतो, असे आसिफा यांनी म्हटले आहे.
आसिफाचे बंधू बिलावल भुट्टो झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आहेत. मागील आठवडय़ातच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. भावाच्या मदतीसाठी आसिफा पहिल्यांदाच राजकीय सभेत सक्रीय दिसून आल्याचे मानले जात आहे.
सभा रोखण्यास इम्रान अपयशी
मुल्तान येथील सभा रोखण्यासाठी इम्रान खान सरकारने पूर्ण जोर लावला होता, सभास्थळाच्या कित्येक किलोमीटर अंतरापूर्वीच बॅरिकेड्स आणि कंटेनर्स लावण्यात आले होते, तरीही हजारो कार्यकर्ते सभेला हजर राहिले आहेत. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम आणि जमात-ए-इस्लामचे नेते मौलाना फजल-उर-रहमान हे देखील या सभेत सहभागी झाले होते. पीडीएमध्ये एकूण 11 विरोधी पक्ष आहेत.
इम्रान खान भ्रमात
विरोधकांना दडपता येईल या भ्रमात इस्लामाबादमधील सरकार आहे. आम्ही प्रत्येक जुलुमाच्या विरोधात आवाज उठविणार आहोत ‘तुमचा वेळ संपला आहे’ हा एकच संदेश इम्रान खान यांना देते. माझ्या आईने देशासाठी बलिदान केले, वडिल आजही संघर्ष करत आहेत. अटक आणि छळाला लोक घाबरतील असे इम्रान यांना वाटते, परंतु आमच्या भावांना अटक केल्यास आम्ही बहिणी सरकारशी लढू असे उद्गार आसिफा यांनी काढले आहेत.
कुटुंबात सर्वात छोटी
आसिफ अली झरदारी आणि बेनझीर भुट्टो यांना 3 अपत्य असून 27 वर्षीय आसिफा यात सर्वात लहान आहे. आसिफाचे पूर्ण शिक्षण ब्रिटनमध्ये पार पडले आहे. आसिफाची मोठी बहिण बख्तावर हिचा अलिकडेच लंडनच्या उद्योजकाशी विवाह झाला आहे. तर बंधू बिलावल पीपीपीचे अध्यक्ष आहेत. आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिले आहेत. तर माजी पंतप्रधान बेनझीर 27 डिसेंबर 2007 रोजी एका दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेल्या होत्या.









