कराची
हैदर अली, इमरान खान व काशिफ भट्टी हे तीन खेळाडू कोव्हिड-19 चाचणीत निगेटिव्ह आले असून दि. 8 जुलै रोजी ते इंग्लंडला रवाना होणार आहेत. पाकिस्तानी संघाचे पहिले पथक यापूर्वीच इंग्लिश भूमीत दाखल झाले असून सध्या ते वर्सेस्टरमध्ये सराव करत आहेत. पुढील महिन्यात दोन्ही संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका होणे अपेक्षित आहे. या मालिकेला दि. 5 ऑगस्ट रोजी मँचेस्टरमध्ये प्रारंभ होईल. 3 खेळाडूंसह मलांग, मोहम्मद इम्रान हे मसाजर देखील इंग्लंडला रवाना होतील. या उभयतांचाही कोव्हिड अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जलद गोलंदाज हॅरिस रौफचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. प्रारंभी, पॉझिटिव्ह ठरलेल्या 10 खेळाडूंतील अद्याप पॉझिटिव्ह असणारा तो एकमेव खेळाडू आहे. फकहर झमन, मोहम्मद हस्नेन, हाफीज, रिझवान, शदाब खान व वहाब रियाझ हे सहा खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत.
दुसऱयांदा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर मागील शुक्रवारी इंग्लंडला रवाना झाले. या दौऱयात पाकिस्तानचा संघ यजमान इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकाही खेळणार आहे.
अनुभवी फलंदाज शोएब मलिकला उशिराने संघात दाखल होण्यासाठी पीसीबीने मंजुरी दिली. शोएब मलिक संयुक्त अरब अमिरातमध्ये आपल्या कुटुंबियांसह काही वेळ व्यतित केल्यानंतर जुलैच्या उत्तरार्धात इंग्लंडला रवाना होईल, असे संकेत आहेत.









