वृत्त संस्था/ चित्तगाँग
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱयादिवशी पाकने यजमान बांगलादेशला चोख प्रत्युत्तर दिले. बांगलादेशचा पहिला डाव 330 धावांत आटोपल्यानंतर पाकने पहिल्या डावात बिनबाद 145 धावा जमविल्या. बांगलादेशच्या पहिल्या डावात लिटॉन दासने 114 तर मुश्फिकूर रहीमने 91 धावा झळकविल्या. पाकच्या हसन अलीने 51 धावांत 5 गडी बाद केले.
बांगलादेशने 4 बाद 253 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे सहा गडी 77 धावांची भर घालत तंबूत परतले. शतकवीर लिटॉन दास आणि मुश्फिकूर रहीम यांनी पाचव्या गडय़ासाठी 206 धावांची द्विशतकी भागीदारी केली.
शनिवारी खेळाला प्रारंभ झाल्यानंतर हसन अलीने लिटॉन दासला पायचीत केले. त्याने 233 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 114 धावा झळकविल्या. मुश्फिकूर रहीमचे शतक 9 धावांनी हुकले. अश्रफने रहीमला झेलबाद केले. त्याने 11 चौकारांसह 91 धावा जमविल्या. हसन अलीने यासीर अलीचा 4 धावांवर त्रिफळा उडविला. शाहीन आफ्रिदीने टी. इस्लामला 11 धावांवर झेलबाद केले. हसन अलीने अबू जायेदला 8 धावांवर तर हुसेनला खाते उघडण्यापूर्वीच बाद करून बांगलादेश पहिला डाव 114.4 षटकांत 330 धावांवर रोखला. पाकच्या वेगवान गोलंदाज हसन अलीने 51 धावांत 5 तर शाहीन आफ्रिदी आणि आश्रफ यांनी प्रत्येकी दोन तसेच साजिद खानने एक गडी बाद केला. पाकच्या हसन अलीने कसोटी क्रिकेटमध्ये 2021 हंगामात पाचव्यांदा एका डावात 5 गडी बाद केले. हसन अलीने आतापर्यंत सहावेळा एका डावात 5 बळी मिळविले आहेत.
पाक संघाच्या पहिल्या डावाला अबिद अली आणि अब्दुल शफीकने दमदार सुरूवात करून दिली. या जोडीने दिवसअखेर 57 षटकांत बिनबाद 145 धावा जमविल्या. अबीद अली कसोटीतील आपल्या चौथ्या शतकाकडे वाटचाल करताना 150 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 93 तर अब्दुला शफीक 162 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावांवर खेळत आहे. बांगलादेशच्या गोलंदाजांना पाकची ही सलामीची जोडी दुसऱया दिवशीच्या खेळात फोडता आली नाही. संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 114.4 षटकात सर्वबाद 330 (लिटॉन दास 114, मुश्फिकूर रहीम 91, मेहदी हसन मिराज नाबाद 38, टी. इस्लाम 11, नझमुल हुसेन 14, हसन अली 5-51, शाहीन आफ्रिदी 2-70, फईम आश्रफ 2-54, साजीद खान 1-79), पाक प. डाव- 57 षटकांत बिनबाद 145 (अबीद अली खेळत आहे. 93, अब्दुल शफीक खेळत आहे. 52).









