शाहिद अब्बासी यांच्यासह युसूफ गिलानींना कोरोनाची लागण : जगभरात 77 लाखांहून अधिक रुग्ण
जगभरात आतापर्यंत 4 लाख 28 हजार 727 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर बाधितांचा आकडा 77,63,073 वर पोहोचला आहे. कोरोना संसर्गावर आतापर्यंत 39,79,998 जणांनी मात केली आहे. पाकिस्तानात शाहिद खाकन अब्बासी यांच्यानंतर आणखी एक माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. युसूफ रझा गिलानी यांना एनआयबीच्या चौकशीच्या ससेमिऱयामुळे कोरोना संसर्गाची लागण झाल्याचा आरोप त्यांच्या पुत्राने शनिवारी केला आहे.
पाकिस्तान : संकट गडद

4 दिवसांत दोन माजी पंतप्रधान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पाकिस्तानातील कोरोना बाधितांचा आकडा 1,32,405 वर पोहोचला आहे. तर 2,551 जण या संसर्गामुळे दगावले आहेत. टाळेबंदीची योग्यप्रकारे अंमलबजावणी न झाल्याने रुग्णांच्या संख्येत प्रचंड भर पडत आहे. अपुऱया आरोग्यव्यवस्थेमुळे कोरोनाबाधितांवर योग्यप्रकारे उपचार करणे देशात अवघड ठरत चालले आहे.
दहशतवाद्यांचे उपचार केंद्र

सोमालियातील दहशतवादी संघटना अल-शबाबने कोविड-19 उपचार केंद्र तयार केल्याचा दावा केला आहे. राजधानी मोगादिशूपासून 380 किलोमीटर अंतरावरील जिलिब या ठिकाणी हे केंद्र स्थापन करण्यात आल्याचा दावा आहे. एक दशकापेक्षा अधिक काळापासून ही संघटना आफ्रिकेच्या देशांमधील सरकार पाडविणे आणि इस्लामिक कायद्यांनी चालणारे सरकार आणण्यासाठी हिंसक कारवाया करत आहे.
बीजिंग : वॉरटाईम इमर्जन्सी

चीनची राजधानी बीजिंगच्या काही भागांमध्ये शनिवारी सकाळी टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. शहरातील दोन बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. शिनफादी मांसबाजारात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने परिसरातील 9 शाळा आणि किंडरगार्टेन बंद करण्यात आल्या आहेत. देशातील सर्वात मोठी साखरी खाद्य बाजारपेठ जिंगशेनही बंद करण्यात आली आहे. बीजिंगमध्ये शुक्रवारी 6 रुग्ण सापडले होते.
रशिया : उच्चांकी वाढ

रशियात मागील 24 तासांमध्ये कोरोना संसर्गाचे 8,700 रुग्ण सापडले असून 114 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत 5,20,129 बाधित सापडले आहेत. तर 6,829 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाले असून तेथेच सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. परंतु रशियातील मृत्यूदर जगात अत्यंत कमी आहे.
निदर्शनांमुळे धोका

अमेरिकेत 1 लाख 16 हजार 831 जणांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. दिवसभरात अमेरिकेत 9,618 नवे रुग्ण सापडले असून 308 जणांचा मृत्यू झाला आहे. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनांमुळे अमेरिकेत संसर्गाचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
अमेरिकेत निर्बंध शक्य

अमेरिकेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा निर्बंध लादले जाऊ शकतात. आकडा अशाचप्रकारे वाढत राहिल्यास मार्चमध्ये लागू केलेल्या उपाययोजनांवर पुन्हा अंमलबजावणी केली जाऊ शकते. अद्याप कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही, परंतु पर्याय खुले असल्याचे उद्गार आरोग्य मंत्रालयातील अधिकारी जे. बटलर यांनी काढले आहेत.
स्तनपानामुळे बाळालाधोका नाही

स्तनपानामुळे संसर्गाचा धोका नाही. कोरोनाबाधित महिला बाळाला स्तनपान करू शकते. कोविड-19 ने बाधित किंवा संसर्गाचा संशय असल्यावरही बाळाला स्तनपान केले जावे. संबंधित महिला खूपच आजारी नसल्यास बाळाला तिच्यापासून वेगळे केले जाऊ नये, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रियेसेस यांनी केली आहे.
फ्रान्स : प्रवासाची अनुमती

फ्रान्स सरकार 15 जूनपासून प्रवाससंबंधीचे काही निर्बंध हटविणार आहे. युरोपीय महासंघाकरता प्रवास करता येणार आहे. तसेच अंडोरा, आइसलँड, मोनाको, नॉर्वे, सॅन मरीनो आणि स्वीत्झर्लंडमधून लोकांना दाखल होता येईल. या देशांमधून येणाऱया लोकांवर क्वारंटाईनचे बंधन लागू नसेल. स्पेन आणि ब्रिटनसाठी मात्र कठोर निर्बंध कायम आहेत.









