इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे महान अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान यांचे रविवारी सकाळी वयाच्या 85 व्या वषी निधन झाले. शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना इस्लामिक आण्विक बॉम्बचे जनक असे संबोधले जाते. भारताने मे 1998 मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे पाच अणुबॉम्बची चाचणी केल्यानंतर पाकिस्तानने डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या नेतृत्वाखाली अणुचाचण्या केल्या. त्यानंतर ते पाकिस्तानबरोबरच इस्लामिक जगात नायक बनले. त्यांच्यावर अनेक देशांना आण्विक तंत्रज्ञान विकल्याचा आरोपही होता. अब्दुल कादीर खान यांचा जन्म 1 एप्रिल 1936 रोजी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे झाला होता. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले होते.









