लष्करप्रमुखांचा इशारा : आंतरराष्ट्रीय सीमेवरील फॉरवर्ड भागांचा केला दौरा
जम्मू, श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी लष्करप्रमुखांनी पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास तसेच सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, तर अजिबात खपवून घेणार नाही असे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी सोमवारी स्पष्ट केले. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु असल्याने त्यांनी हा इशारा दिला. सोमवारी त्यांनी पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील फॉरवर्ड भागांचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला आहे.
लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी सोमवारी जम्मूमधील सैन्य तैनातीचा व सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी फिल्ड कमांडर्स आणि सैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लष्करप्रमुखांनी पश्चिम कमांडच्या अधिकाऱयांना संबोधित केले. पाकिस्तानी सैन्याने आगळीक केल्यास त्यांना वेळीच रोखण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. तसेच घुसखोरी आणि दहशतवादी हल्ला उधळून लावण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सक्षम असून लष्कर कुठलीही परिस्थिती हाताळू शकते’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लष्करप्रमुखांनी फॉरवर्ड भागात येणाऱया भागाला भेट दिल्यानंतर मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत पाकिस्तानने 2,542 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे. लष्करप्रमुखांच्या दौऱयापूर्वीही रविवारी रात्री पाकिस्तानने राजौरीच्या नौशेरा आणि पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार केल्याचेही सांगण्यात आले.
अनंतनाग-बारामुल्लामध्ये पाच दहशतवादी ठार
अनंतनाग जिल्हय़ात श्रीगुफवाडा येथे सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दुसरीकडे, बारामुल्ला जिल्हय़ात रविवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानींसह तिघांचा खात्मा करण्यात आल्याचे सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले. अबू रफिया उर्फ उस्मान आणि सैफुल्लाह अशी दोघा पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे आहेत. दुसऱया कारवाईत गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर सोमवारी सकाळी 6 वाजताच अनंतनागमध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली. यावेळी मोहीम सुरू असतानाच झालेल्या धुमश्चक्रीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आले.









