आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला 5 गडी राखून नमवले, हॅरिस रौफचे 4 बळी
शारजाह / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज हॅरिस रौफने 22 धावात 4 फलंदाज गारद केल्यानंतर पाकिस्तानने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 5 गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 8 बाद 134 धावा केल्या तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने 18.4 षटकात 5 बाद 135 धावांसह सहज विजय संपादन केला. पाकिस्तानसाठी हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.
यापूर्वी, न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव आपण खेळू शकणार नसल्याचे सांगत दौरा सुरु होण्यापूर्वीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे, पाकिस्तानची वर्ल्डकप तयारी होऊ शकली नव्हती. पण, त्याच न्यूझीलंड संघाला चारीमुंडय़ा चीत करत पाकिस्तानने येथे चांगलाच वचपा काढला.
विजयासाठी 135 धावांचे आव्हान असताना कर्णधार बाबर आझम अवघ्या 9 धावांवर बाद झाला. पॉवर प्लेच्या 6 षटकात पाकिस्तान 1 बाद 30 अशा स्थितीत होता आणि भारताविरुद्ध मागील लढतीप्रमाणे येथे सहज धावा होत नसल्याचे त्यांना जाणवले. मात्र रिझवानने धावफलक हलता ठेवत 33 धावांचे योगदान दिले. फखर झमन 11 धावांवर बाद झाला. शिवाय, हाफीज व इमाद देखील प्रत्येकी 11 धावांवर परतले. निर्णायक टप्प्यात अनुभवी शोएब मलिक (20 चेंडूत नाबाद 26) व असिफ अली (12 चेंडूत नाबाद 27) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ः 20 षटकात 8 बाद 134 (डॅरेल मिशेल 20 चेंडूत 27, डेव्हॉन कॉनव्हे 24 चेंडूत 27. हॅरिस रौफ 4-22). पाकिस्तान ः 18.4 षटकात 5 बाद 135 (रिझवान 34 चेंडूत 5 चौकारांसह 33, शोएब मलिक 20 चेंडूत नाबाद 26, असिफ अली 12 चेंडूत नाबाद 27. ईश सोधी 2-28).









