वृत्तसंस्था/ लाहोर
यजमान पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 अशा फरकाने पराभव करीत मालिकाविजय मिळविला. बऱयाच कालावधीनंतर ऑस्ट्रेलियन संघाला वनडे मालिकेत पाककडून पराभव पत्करावा लागला आहे. या संपूर्ण मालिकेत पाकचा फलंदाज इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझम यांची फलंदाजी चांगलीच बहरली. बाबर आझम सामनावीर व मालिकावीराचा मानकरी ठरला. त्याला कार बक्षिसादाखल मिळाली. या मालिकेनंतर आपण आता अनुभवी खेळाडू झाल्याचे मत इमाम उल हकने व्यक्त केले.
या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात पाकतर्फे कर्णधार बाबर आझमने नाबाद शतक झळकविले. त्याचप्रमाणे हॅरीस रॉफ आणि मोहम्मद वासीम ज्युनियर यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविल्याने पाकने ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या शेवटच्या सामन्यात इमाम उल हकने नाबाद 89 धावांची खेळी केली. बाबर आझमने नाबाद 109 धावा झळकविल्या. या संपूर्ण मालिकेत पाकच्या इमाम उल हक, बाबर आझम यांची फलंदाजी निर्णायक ठरली.









