सारे जग, भारत आणि स्वतः पाकिस्तानातही कोरोनाच्या उद्रेकामुळे हाहाकार माजलेला आहे. तरीही भारताचे रक्त सांडण्याची त्या देशाची खुमखुमी काही कमी होत नाही. गेल्या आठवडाभरात काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे तीन दहशतवादी हल्ले झाले. त्यात भारताच्या आठ सैनिकांना प्राण गमवावे लागले. त्यांच्यामध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱयांचाही समावेश होता. अर्थात, भारतानेही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत दहशतवादी आणि पाक सैनिकांचे मोठे नुकसान केले आहे. भारतीय सेनेचे सर्वात मोठे यश रियाझ नायकू याचा खात्मा हे होय. नायकू हा हिजबुल मुजाहिद्दिन या संघटनेचा काश्मीरमधील म्होरक्या होता. त्याची नियुक्ती याच संघटनेचा बुरहान वानी याच्या खात्म्यानंतर झाली होती. वानी हा भारतीय सैनिकांच्या गोळीबारात चार वर्षांपूर्वी ठार झाला. तेव्हापासून काश्मीरमधील हिजबुलची सूत्रे या नायकूच्या हाती होती. एकेकाळी गणिताचा शिक्षक असणारा हा नायकू नंतर दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि स्वतःच दहशतवादी बनला. गेल्या आठ वर्षांमध्ये त्याने काश्मीरमध्ये मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक दहशतवादी हल्ले आणि हिंसाचारांमध्ये त्याने सूत्रधाराची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो सुरक्षा यंत्रणेला हवा होता. त्याच्यावर 15 लाख रूपयांचे इनामही लावण्यात आले होते. त्याला कंठस्नान घातल्याने त्याच्या टोळीचा पुरता बीमोड झाल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. तथापि, दहशतवादी संघटनांच्या अशा कित्येक टोळय़ा आहेत. एक नेता संपला की त्याची जागा घेण्यासाठी दुसरा पुढे येतो. दहशतवाद ही एक कधीही न संपणारी विकृती आहे. तिचा सामना अत्यंत कठोरपणे करणे आवश्यक असते. तेथे दयामाया दाखवून किंवा मानवाधिकारांची गोंडस भाषा करून काहीही साध्य होत नसते. भारतात धुमाकूळ घालणाऱया या इस्लामी दहशतवाद्यांना आवश्यक ते सर्व साहाय्य, आर्थिक रसद, प्रशिक्षण, अत्याधुनिक शस्त्रे व संपर्क साधने पाकिस्तानकडून पुरविण्यात येतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत या दहशतवाद्यांकडे चिनी शस्त्रास्त्रेही सापडली आहेत. याचाच अर्थ चीनचीही दहशतवाद्यांना फूस आहे असा होतो. एकंदर, भारत आणि भारताची अर्थव्यवस्था मोडकळीला आणण्याचा प्रयत्न हे दोन्ही देश हातात हात घालून करीत आहेत. दोघांनाही भारताविषयी असूया आणि द्वेष आहे. प्रशांत महासागरीय क्षेत्रात आणि भारतीय उपखंडात भारत एक समर्थ शक्तीच्या रूपात पुढे येत आहे. भारताचे महत्त्व आता अमेरिका आदी पाश्चिमात्य देशांनी ओळखले आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या महत्त्वाकांक्षांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेपटीवर पाय दिलेल्या सापासारखी त्यांची अवस्था झाली आहे. विशेषतः पाकिस्तानची अवस्था सध्या जास्तच दयनीय आहे. कोरोनामुळे त्याचे कंबरडे मोडले आहे. मृददेह पुरण्यासाठीही जागा शोधण्याची वेळ आली आहे, असे त्या देशातील माध्यमे म्हणतात. अशावेळी कोणत्याही सभ्य प्रशासनाने आधी आपल्या देशाकडे लक्ष पुरविले असते. पण सभ्यता आणि सुसंस्कृतता यांची अपेक्षा पाकिस्तानकडून ठेवणेच चुकीचे आहे. त्यामुळे कोरोनाने आपल्या देशातील माणसे किडामुंगीसरखी मरत असताना भारताला अस्थिर करणे आणि भारतात हिंसाचार माजविण्याचे तो सोडत नाही. त्यामुळे त्या देशाला आता कोणतीही सवलत न देता धडा शिकविण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानबद्दल भारताने केवळ प्रतिकार हे धोरण न स्वीकारता प्रतिआक्रमण करणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने इस्रायलने आपल्या उपद्रवी मुस्लीम शेजाऱयांचा बंदोबस्त केला आणि त्यांच्या मनात स्वतःबद्दल भीती निर्माण केली, तशीच अवस्था भारताने पाकिस्तानची करणे आवश्यक आहे. शेवटी सहनशक्तीलाही मर्यादा असते. केवळ जशास तसे वागूनही आता भागणार नाही. कारण तेवढय़ाने पाकिस्तान बधणार नाही. पाकिस्तानचे औषध आता त्यालाच पाजावे लागेल. त्याशिवाय त्याला त्याची चव समजणार नाही. भारताचे भूसेनाप्रमुख मनोज नरवणे यांनी याचे संकेत दिले आहेतच. त्याप्रमाणे लवकरात लवकर कृती केली जाईल, अशी अपेक्षा आहे. वास्तविक असे प्रति आक्रमक धोरण प्रारंभापासून कित्येक दशकांपूर्वीपासून स्वीकारावयास हवे होते. पण ‘शांती’ या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावून त्यावेळच्या भारतीय नेतृत्वाने भारताची प्रतिमा एक ‘सॉफ्ट स्टेट’ अशी बनविली. नंतर अशी प्रतिमा हाच प्रतिष्ठेचा मुद्दा बनविण्यात आला. पाकिस्तानबद्दल अनाठायी आणि नको इतकी सहानुभूती बाळगणाऱयांचा एक वर्ग आपल्याकडे नेहमी कार्यरत असतो. देशहितापेक्षा ‘शांती’ श्रेष्ठ असे त्याचे आत्मघातकी तत्त्वज्ञान असते. पाकने कितीही आणि कोणताही त्रास दिला तरी आपण संयमाचेच दर्शन घडविले पाहिजे असा या वर्गाचा आग्रह असतो. त्यासाठी भारताच्या सरकारवर दबाव आणण्यापर्यंत त्याची मजल जाते. हा वर्ग हेच पाकिस्तानचे खरे भांडवल आहे. तेव्हा अशा लोकांच्या ‘विचारवंती’ दबावाखाली न येता, भारत सरकारने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत पण त्याच्याहीपेक्षा कठोर प्रत्युत्तर द्यावे. तसे देण्यास आपली सेनादले समर्थ आहेत. मोदी सरकारचे धोरणही बोटचेपे निश्चितच नाही. आज पाकिस्तान त्याच्याच कारनाम्यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोरही उघडा पडला आहेच. या स्थितीचा फायदा घेऊन सरकारने पाकिस्तानला नामोहरम करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलावीत. पाकिस्तानला जितकी सवलत दिली जाईल, तितकी त्याची विकृती वाढतच जाईल. त्यामुळे त्या देशाला सातत्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या दबावाखाली ठेवावे लागणार आहे. तसे केल्यास भारतीय जनतेचा पाठिंबा सरकारला मिळाल्याखेरीज राहणार नाही. कारण ‘पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा’ अशी सार्वत्रिक भावना आहे. तिला अनुसरून सरकारने आता विनाविलंब कृती करणे आवश्यक आहे. पाकिस्तान हा देश एखाद्या घातक विषाणूप्रमाणे आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास तो फोफावणार हे निश्चित आहे. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच त्याचा नायनाट करणे आवश्यक आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








