लखनौ / वृत्तसंस्था :
सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी लखनौ येथे आयोजित डिफेन्स एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची गुरुवारी पाहणी केली आहे. पाकिस्तान सीमेवरील तळांवरून दहशतवाद्यांना भारतात घुसवू पाहत आहे. पण भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. याच अपयशामुळे पाकिस्तान नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करत असल्याचे विधान सैन्यप्रमुखांनी केले आहे.
काश्मीर खोऱयात मागील 6 महिन्यांमध्ये दहशतवादी कारवाया घटल्या आहेत. ग्रेनेड फेकणे आणि आयईडी हल्ले तसेच गोळीबाराच्या घटना कमी झाल्या आहेत. काश्मीरमधील भारत-पाक सीमेवर तैनात सैनिकांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रs पुरविली जात आहेत. सैन्याला सिग सॉर असॉल्ट रायफल आणि स्पाइक अँटीटँक क्षेपणास्त्रासारखी शस्त्रास्त्रs मिळाली आहेत. ही शस्त्रास्त्रs सीमावर्ती चौक्यांमध्ये तैनात सैनिकांना उपलब्ध केली जात असल्याचे सैन्यप्रमुख म्हणाले. शारंग तोफ देखील भारतीय सैन्यात शुक्रवारी सामील होणार आहे. 155 एमएमची शारंग तोफ ही अत्याधुनिक आवृत्ती असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नौदलाला मिळणार अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र
चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाचे वाढते बळ आणि सागरी धोका पाहता भारतीय नौदलासाठी एक नवे अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र निर्मिले जात आहे. सुमारे 1 हजार किलोमीटर अंतरापर्यंत समुद्रामधून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम या क्रूझ क्षेपणास्त्राला ब्राह्मोसच्या प्रक्षेपकामधून डागता येणार आहे. या क्षेपणास्त्राच्या मारक पल्ल्यात पूर्ण पाकिस्तान आणि चीनचा भारताला लागून असलेला भाग असणार आहे. हे क्षेपणास्त्र स्वनातीत वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असेल.
ब्राह्मोसच्या प्रक्षेपकाचा आतापर्यंत सुमारे 30 युद्धनौकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. नौदलाने अशाप्रकारच्या क्षेपणास्त्राची मागणी केल्यानेच डीआरडीओ याची निर्मिती करत आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये या प्रस्तावाला अनुमती मिळणार असून 2023 च्या प्रारंभी या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी होऊ शकते.
20 चाचण्या होणार
या क्षेपणास्त्राच्या निर्मितीचे काम डीआरडीओच्या बेंगळूर येथील प्रयोगशाळेला देण्यात आले आहे. याच प्रयोगशाळेने भारताचे पहिले स्वनातीत क्षेपणास्त्र निर्भयची निर्मिती केली होती. नव्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या 20 चाचण्या होणार असून याकरता पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी उंचीवर उड्डाण करत शत्रुवर वार करणार आहे.
रडारला चकवा
या क्षेपणास्त्रात स्वदेशनिर्मित सीकर बसविण्यात येणार आहेत. तसेच या क्षेपणास्त्राची हवाई तसेच पाणबुडी आवृत्तीही निर्माण केली जाणार आहे. क्षेपणास्त्रामुळे नौदलाला एक हजार किलोमीटर अंतरावरील शत्रूवर प्रहार करण्याची क्षमता प्राप्त होईल. हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी उंचीवरून उडणार असून रडारला चकवा देण्यास यशस्वी ठरणार आहे.









