काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांची मागणी
वृत्तसंस्था / अमृतसर
भारत आणि पाकिस्तानदरम्यान ठप्प पडलेला व्यापार पुन्हा सुरू करण्याची मागणी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी शनिवारी केली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार बंद राहिल्याने पंजाबच्या व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो जणांना नोकरी गमवावी लागली आहे. भारत-पाकिस्तान व्यापाराच्या संभाव्य कक्षेचा 5 टक्के देखील आम्ही वापर करत नसल्याचा दावा सिद्धू यांनी केला आहे.
पंजाबला मागील 34 महिन्यात 4 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 15 हजार नोकऱया गमवाव्या लागल्या. पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी एक मोठा मुद्दा ठरणार आहे. कमी कालावधीत देखली आम्ही जनतेला एक व्हिजन देऊ याची हमी मी देतो असे उद्गार सिद्धू यांनी काढले आहेत.
दृष्टी सर्वांकडे असते, पण व्हिजन काही जणांकडेच असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार पुन्हा सुरू करावा असे यापूर्वीही मी म्हटले होते आणि आताही म्हणत आहे. हा निर्णय घेतल्यास सर्वांनाच लाभ होईल असे सिद्धू यांनी सांगितले. सिद्धू यांनी यापूर्वी कर्तारपूर साहिब दौऱयादरम्यान असेच विधान केले होते.
महायुद्धांमध्ये लाखो लोकांच्या मृत्यूनंतर युरोप ‘एक युरोप-एक व्हिसा’वर स्वतःच्या सीमा खुल्या करू शकतात, एक पासपोर्ट आणि एक चलन ठेवू शकतात मग आमच्या क्षेत्रात असे का घडू शकत नाही. 74 वर्षांमध्ये उभ्या करण्यात आलेल्या भिंतींमधील खिडक्या खुल्या करण्याची गरज आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापार व्हावा असे सिद्धू यांनी म्हटले होते.









