भारतीय सैन्याची धडक मोहीम, ब्रम्हपुत्रेवर धरण बांधून चीनचीही जिरवणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात दहशतवादी घुसविण्यासाठी पाकिस्तानने बोगद्यांच्या मार्गांचा उपयोग करण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारतील सैन्याला याचा सुगावा लागताच काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरात घुसून अशा बोगद्यांचा शोध घेण्यात आला. किमान दोन मोठे बोगदे भारतीय सैनिकांनी नष्ट केल्याची माहिती देण्यात आली.
भारतीय सैन्याला या बोगद्यांच्या प्रारंभीच्या टोकापर्यंत जाण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरच्या प्रदेशात 200 मीटर पर्यंत जावे लागले. बोगद्यांमध्ये त्यांना मोठय़ा प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळय़ाचा साठा आढळला. तो ताब्यात घेण्यात आला. या महत्वपूर्ण कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीला अटकाव करण्यात यश आले.
सांबा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ हे बोगदे आढळून आले होते. त्यानंतर त्वरित कारवाईची योजना आखण्यात आली. या कारवाईत किती सैनिकांनी भाग घेतला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र कारवाई यशस्वी झाल्याची माहिती सेनेच्या वरीष्ठ अधिकाऱयांनी दिली.
मोबाईलवरून शोध
नोव्हेंबरच्या तिसऱया आठवडय़ात भारतीय सेनेने चार दहशवाद्यांना ठार मारले होते. त्यांच्याकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्या मोबाईलची तपासणी केली असता, या बोगद्यांचा शोध लागला. त्यानंतर ते नष्ट करण्यासाठी ही धडक कारवाई करण्यात आली, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रम्हपुत्रेवर भारतही धरण बांधणार
हिमालयात उगम पावणारी ब्रम्हपुत्रा नदी तिबेटच्या प्रदेशातून वहात येऊन अरूणाचल प्रदेशात भारताच्या प्रदेशात प्रवेश करते. चीनने तिबेटमध्ये भारतीय सीमेनजीक या नदीवर दोन धरणे बांधली आहेत. यामुळे भारताला होणाऱया पाठीपुरवठय़ावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. पावसाळय़ाच्या दिवसात या धरणांमधून जास्त पाणी सोडले गेल्यास आसाममध्ये पुराचे संकट गंभीर बनते. आता भारताने चीनच्या या चालबाजीवर उपाय शोधला आहे. भारतही अरूणाचल प्रदेशात या नदीवर मोठे धरण बांधण्याची योजना आखत आहे. त्यामुळे चीनकडून निर्माण होऊ शकणाऱया जलसंकटाला प्रत्युत्तर देणे भारताला शक्य होईल, अशी भूमिका यामागे आहे. भारताने ही धरण योजना क्रियान्वित केल्यास ब्रम्हपुत्रेच्या जलप्रवाहावर भारताचेही नियंत्रण प्रस्थापित होईल. तसेच वेळी अवेळी आपल्या धरणातून पाणी सोडून किंवा ते आडवून भारतात पूरसंकट किंवा जलटंचाई निर्माण करण्याचे चीनचे दुष्ट डावपेच हाणून पाडणे भारताला शक्य होईल. अशा प्रकारे चीनचे कावेबाज मनसुबे नष्ट होऊ शकतात असे प्रतिपादन काही भारतीय अधिकारी व तज्ञांनी केले आहे.









