ऑनलाईन टीम / मुजफ्फराबाद :
चीनकडून पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये बांधण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. सोमवारी रात्री चीनच्या धरण बांधकामविरोधात स्थानिकांनी मशाल रॅली काढली.
नीलम आणि झेलम नदींवर चीनकडून धरण बांधण्यात येत आहे, हे बांधकाम बेकायदेशीर आहे. नदींवर ताबा मिळवून पाकिस्तान आणि चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी केला आहे. धरणाच्या बेकायदेशीर बांधकामामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे, असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील कोहलामध्ये 2.4 अब्ज डॉलरच्या हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी पाकिस्तान आणि चीनमध्ये करार झाला आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’ प्रकल्पाचा भाग आहे. हा जलविद्युत प्रकल्प पूर्ण झाल्यास पाकिस्तानला कमी दरात वीज उपलब्ध होणार आहे. भारताने या प्रकल्पासाठी विरोध दर्शविला होता. मात्र, चीनने भारताचा विरोध झुगारून प्रकल्पाचे काम पुढे सुरू ठेवले आहे.









