‘ग्रे’ यादीत कायम राहण्याचे संकेत
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
दहशतवादी संघटनांसह संशयितांवर कारवाई न केल्यामुळे पाकिस्तान फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) करडय़ा (ग्रे) यादीत कायम राहणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सरकारने दहशतवादविरोधी कृती योजनेतील अटी न पाळल्यामुळे त्यांच्यावर एफएटीएफची वक्रदृष्टी कायम असल्याचे दिसून येत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय 21 ते 23 ऑक्टोबर रोजी होणाऱया एफएटीएफ उपसमूहांच्या बैठकीमध्ये होणार आहे.
एफएटीएफने लादलेल्या अटींपैकी सहा महत्त्वाच्या अटी पार पाडण्यात पाकिस्तानला अपयश आले आहे. मौलाना मसूद अझर आणि हाफिज सईद या दोन महत्त्वाच्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस पाकिस्तान सरकारने दाखवलेले नाही. तसेच पाकिस्तानमधून जवळपास 4 हजारहून अधिक संशयित दहशतवादी बेपत्ता झाल्याची माहितीही उजेडात आल्यामुळे इम्रान खान सरकार आणखीनच अडचणीत सापडले आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवायांकडे कानाडोळा करत असल्याने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे जगातील चार मोठे देश पाकिस्तानवर नाराज आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सध्या ग्रे यादीमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.









