शेख राशिद, अब्बासी कोरोना पॉझिटिव्ह
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शेख राशिद हे आयसोलेशनमध्ये गेले आहेत. तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केल्यावर भारताला पोकळ धमकी देत राशिद यांनी पाकिस्तान अणुबॉम्बने हल्ला करणार असल्याचे म्हटले होते. एका जाहीर सभेत राशिद यांना माइकला स्पर्श करताच विजेचा धक्का बसला होता. विजेचा धक्का बसला तेव्हा राशिद हे पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत होते. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. तसेच विजेचा धक्का लागण्यामागे भारताचा हात असल्याचा अजब दावाही त्यांनी केला होता. ऑगस्ट 2019 मध्ये लंडन येथे राशिद यांना लोकांनी मार दिला होता. वाचण्यासाठी राशिद यांना पळ काढावा लागला होता.









