वृत्तसंस्था/ लाहोर
पाकचा 16 वर्षीय युवा क्रिकेटपटू नसीम शहाचे नाव यू-19 विश्वचषक स्पर्धेतून काढण्यात आले असल्याचे पीसीबीने जाहीर केले असून त्याच्या जागी व मोहम्मद वासिम ज्युनियरचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले. 17 जानेवारीपासून ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत सुरू होणार आहे.
पाक क्रिकेट मंडळाने वास्तवादी दृष्टिकोन ठेवून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. नसीम हा युवा खेळाडू असला तरी वरिष्ठ संघातून खेळत त्याने प्रभावी प्रदर्शन केलेले आहे. त्यामुळे पुन्हा त्याला कनिष्ठ संघातून खेळवणे योग्य ठरणार नाही, असा विचार पीसीबीने केला आहे. नसीमने तीन कसोटी खेळल्या असून एकदा पाच बळीही मिळविले आहेत. ‘आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धा ही भविष्यातील स्टार खेळाडूंसाठी पहिली पायरी असते आणि नवोदित युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव दाखविण्याचे व्यासपीठही असते. नसीमने या मर्यादा पार केल्या असून आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याने आपली क्षमताही सिद्ध करून दाखविली आहे,’ असे पीसीबीचे प्रमुख कार्यकारी वासिम खान म्हणाले. नसीम शहाने गेल्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तो पाकमध्येच राहणार असून गोलंदाज प्रशिक्षक वकार युनूस यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीतील कौशल्य आत्मसात करीत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.









