वृत्तसंस्था / कराची
पाकचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून अनपेक्षित धक्का दिला. मानसिक छळणुकीमुळे मला क्रिकेट सोडावे लागत असल्याचे अमीरने पत्रकाराशी बोलताना सांगितले.
पाक क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) सध्याच्या व्यवस्थापन समितीकडून आपला मानसिक छळ झाल्याचा आरोप मोहम्मद अमीरने केला. 28 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने व्हिडिओद्वारे प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या निवृत्तीची अनपेक्षित घोषणा करून आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मोहम्मद अमीरची ही मुलाखत पाकच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आली. पीसीबीच्या व्यवस्थापन समितीकडून होत असलेला मानसिक छळ यापुढे आपण सहन करू शकत नसल्याने निवृत्तीचा निर्णय मला घ्यावा लागला.
क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मी स्वत: घेतल्याचे मोहम्मद अमीरने म्हटले आहे. 2010 ते 2015 या पाच वर्षांच्या कालावधीत पीसीबीच्या मानसिक छळाला मला तोंड द्यावे लागले होते. पीसीबीने माझ्यावर यापूर्वी कारवाई करून शिक्षाही दिली, असे तो म्हणाला. मोहम्मद अमीरचे सध्या वास्तव्य श्रीलंकेत आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मोहम्मद अमीर दोषी ठरला होता. मोहम्मद अमीरने 36 कसोटी, 119 बळी मिळविले आहेत. 2009 साली मोहम्मद अमीरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2010 ते 2015 या पाच वर्षांच्या कालावधीत मोहम्मद अमीरवर पीसीबीने स्पॉटफिक्सिंगच्या प्रकरणात बंदी घातली होती.









