नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली पाकिस्तानच्याच एका मंत्र्याने संसदेत दिल्यामुळे सरकारवर नाहक टीका करणाऱया काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याची कबुली पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिली होती. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील पाकिस्तानने आपला सहभाग मान्य केला आहे. आता काँग्रेस व इतरांनी षड्यंत्राच्या आरोपाविषयी देशाची माफी मागायला हवी, असे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात ‘फिक्सिंग’ झाल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यातून काँग्रेसचा भारतविरोधी द्वेष व्यक्त होतो, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.
पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, ही बाब मान्य केली आहे. फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ल्याचे श्रेय इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयला दिले. पुलवामा हल्ला इम्रान खान यांच्यासाठी एक मोठी उपलब्धता होती, असेही ते म्हणाले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. एका आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळवली होती. या स्फोटात 40 जवान हुतात्मा झाले होते. फवाद चौधरी यांच्या अगोदर पाकिस्तानचा राजकीय पक्ष पीएमएल-एनच्या खासदाराने भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला असता असे वक्तव्य केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता. त्याच्या दुसऱयादिवशी पाकिस्तानने आपली लढाऊ विमाने भारतात पाठवली होती, त्यांना पळवून लावताना विंग कमांडर अभिनंदन पाकच्या हद्दीत पडले होते. पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते, परंतु 48 तासांच्या आत पाकिस्तानला त्यांना सोडावे लागले होते.