वृत्तसंस्था/ रावळपिंडी
पाकचे क्रिकेट पंच अलीम दार यांनी पंचगिरी क्षेत्रामध्ये वनडे क्रिकेट प्रकारात नवा विक्रम करताना दक्षिण आफ्रिकेचे पंच रूडी कोर्टझन यांचा विक्रम मागे टाकला. सध्या पाक आणि झिंबाब्वे यांच्यातील वनडे मालिका सुरू असून या मालिकेतील येथे झालेल्या दुसऱया सामन्यात अलिम दार पंचगिरी करीत होते. वनडे क्रिकेटमधील त्यांचा हा पंचगिरीचा 210 वा विक्रमी सामना आहे.
वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या रूडी कोर्टझन यांनी सर्वाधिक सामन्यात पंचगिरीचा विक्रम नोंदविला होता पण पाकच्या 52 वर्षीय अलिम दार यांनी झिंबाब्वे विरूद्धच्या वनडे सामन्यात पंचगिरी करून कोर्टझनचा विक्रम मागे टाकला आहे. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये अलिम दार यांनी 132 सामन्यांत पंचगिरी केली आहे. गेल्यावर्षी पर्थ येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात अलिम दार पंच म्हणून कार्यरत होते. विंडीजच्या स्टीव्ह बकनर यांचा विक्रमही अलिम दार यांनी मागे टाकला आहे. दार यांनी 387 आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली असून त्यामध्ये 45 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. इ.स. 2000 च्या फेब्रुवारीमध्ये अलिम दार यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय पंचगिरी कारकीर्दीला प्रारंभ करताना पाक आणि लंका यांच्यातील वनडे सामन्यात त्यांनी पहिल्यांदा पंचगिरी केली होती. आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलचे अलिम दार गेली 16 वर्षे सदस्य आहेत.









