वृत्तसंस्था/ रावळपिंडी
यजमान पाकचा क्रिकेट संघ तब्बल 17 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे. दक्षिण आफ्रिका संघाबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पाकने पहिली कसोटी जिंकून आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी येत्या गुरूवारपासून सुरू होत आहे.
नवोदित क्रिकेटपटूंचा अधिक भरणा असलेल्या पाक संघाला 17 वर्षांनंतर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. 2009 साली लंकेच्या संघावर दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यानंतर पाकमधील कसोटी क्रिकेटला पूर्णविराम मिळाला होता. कोणताही विदेशी संघ पाकचा दौरा करण्यास इच्छूक नव्हता पण दक्षिण आफ्रिकेने 2021 साली बऱयाच वर्षांनंतर पहिल्यांदा पाकचा दौरा केला आहे. पाक संघाने यापूर्वी म्हणजे 2003 साली दक्षिण आफ्रिकेवर कसोटी मालिका विजय नोंदविला होता. कराचीच्या पहिल्या कसोटीत पाकने दर्जेदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा 7 गडय़ांनी पराभव करून मालिकेत आघाडी मिळविली. आता त्यांना मालिका जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ही मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करेल. ही मालिका पाकने जिंकली तर कसोटी मानांकनात ते पाचव्या स्थानावर झेप घेतील तर दक्षिण आफ्रिका संघ पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर राहील.
कराचीच्या पहिल्या सामन्यात कसोटीत पदार्पण करणारा नौमन अली आणि यासीर शहा यांची कामगिरी दर्जेदार झाली. त्याचप्रमाणे फवाद आलमचे पहिल्या डावातील शतक पाकच्या विजयाला हातभार लावणारे ठरले. पाकचे नेतृत्व बाबर आझम करीत आहेत. पाक संघाची न्यूझीलंडच्या दौऱयातील कामगिरी निकृष्ट झाली होती. दक्षिण आफ्रिका संघाचा अलिकडच्या कालावधीतील कसोटीमधील सलग आठवा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भक्कम फलंदाजी करण्यासाठी झगडत आहे. रावळपिंडीच्या दुसऱया कसोटीत हॅरीस रौफचे कसोटी पदार्पण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यासाठी फिरकी गोलंदाज लिन्डेला वगळण्याची शक्यता आहे.









