दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने निर्णायक लढतीत जोरदार रस्सीखेच अपेक्षित
दुबई / वृत्तसंस्था
यंदा आयसीसी टी-20 विश्वचषक जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून गणल्या जाणाऱया पाकिस्तानचा संघ दुसऱयांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी जरुर महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांना आज (गुरुवार दि. 11) होणाऱया दुसऱया उपांत्य लढतीत तुल्यबळ व कोणत्याही क्षणी विस्फोटक खेळ साकारु शकणाऱया ऑस्ट्रेलियाचे आव्हान मोडीत काढावे लागेल. साहजिकच, अपराजित पाकिस्तानचे बुलंद इरादे जिंकणार की, ऑस्ट्रेलियाची महत्त्वाकांक्षा, हे या लढतीत स्पष्ट होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
पाकिस्तानला यापूर्वी 2016 मधील मागील आवृत्तीत पहिल्याच फेरीतून एक्झिट घ्यावी लागली होती. पण, यंदा बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघाने सर्वच संघांना आश्चर्याचे झटके देत उपांत्य फेरीत जोरदार धडक मारली आहे. 2009 मध्ये जेतेपद मिळवणारा हा संघ या मालिकेत अद्याप अपराजित आहे. यापूर्वी, हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत एकदा आमनेसामने भिडले आणि त्यावेळी माईक हसीच्या नेतृत्वाखालील कांगारुंनी पाकिस्तानचा फडशा पाडला होता. आजही त्यांना हीच अपेक्षा असेल. मात्र, पाकिस्तानचा संघ आपल्या सर्वोच्च फॉर्ममध्ये असल्याने कांगारुंसमोरील आव्हान तितकेच खडतर असेल.

2009 मध्ये लंकन संघावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्ण ठप्प झाले आणि त्यानंतर पाकिस्तानने आपल्या घरच्या भूमीवरील सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीतच खेळले. या अनुभवाचा त्यांना यंदा विश्वचषकात उत्तम लाभ झाला.
यंदा सर्वाधिक धावा जमवणाऱया बाबर आझमच्या खात्यावर 264 धावा नोंद असून त्याने यादरम्यान 4 अर्धशतके झळकावली आहेत. आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवरही त्याच आक्रमकतेने तुटून पडण्याचे त्याचे निश्चितच बुलंद इरादे असणार आहेत. सहकारी सलामीवीर मोहम्मद रिझवान देखील उत्तम बहरात असून ही जोडी एकवेळ अपयशी ठरली तरी सिक्स हिटिंग मशिन असिफ अली, अनुभवी शोएब मलिक व मोहम्मद हाफीज उत्तम फटकेबाजी करु शकतात. या संघातील फक्त फखर झमनची बॅटच अद्याप तळपलेली नाही.
पाकिस्तानची गोलंदाजी आघाडी देखील तितकीच भेदक राहिली आहे. शाहिन शाह आफ्रिदीने रोहित शर्मा व केएल राहुलला बाद करत स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू टाकले. त्याचीच पुनरावृत्ती आजही करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. हॅरिस रौफने स्पर्धेत उत्तम मारा केला असून फिरकीपटू इमाद वासिम, मोहम्मद हाफीज, शदाब खान हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाबर आझमचे मुख्य शस्त्र असणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आज झगडणार का?
2010 मधील उपविजेता ऑस्ट्रेलियन संघ सातत्याने हुलकावणी देणाऱया टी-20 विश्वचषक जेतेपदावर आपली मोहोर उमटवण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहे. यंदा निर्णायक क्षणी खेळ उंचावण्यात हा संघ बऱयापैकी यशस्वी झाला असून हीच घोडदौड यापुढेही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. इंग्लंडविरुद्ध 8 गडी राखून पत्करलेला पराभव वगळता अन्य सर्व सामन्यात या संघाने उत्तम वर्चस्व गाजवले आहे. याचमुळे दक्षिण आफ्रिकेला मागे सारत त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
लेगस्पिनर ऍडम झाम्पा स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये दुसऱया स्थानी असून मधल्या षटकात त्याच्या गोलंदाजीला सामोरे जाणे पाकिस्तानसाठी आव्हानात्मक असणार आहे. जोश हॅझलवूड, मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स भेदक मारा साकारण्यात माहीर आहेत. त्यामुळे या आघाडीवर देखील पाकिस्तानच्या आघाडीवीरांना विशेष दक्ष रहावे लागेल. ग्लेन मॅक्सवेल व मिशेल मार्श या अष्टपैलू खेळाडूंमुळे हा संघ अधिक समतोल झाला आहे. शिवाय, डावखुरा फिरकीपटू ऍस्टॉन ऍगरला खेळवण्याचा पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया ः ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍस्टॉन ऍगर, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, फखर झमन, हैदर अली, हॅरिस रौफ, हसन अली, इमाद वासिम, मोहम्मद हाफीज, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वासिम ज्युनियर, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शोएब मलिक.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
वॉर्नर–फिंचला स्वस्तात रोखले तरच पाकिस्तानला आशाअपेक्षा!
डावखुरा, धोकादायक फलंदाज डेव्हिड वॉर्नर उत्तम बहरात परतला असून ऍरॉन फिंच देखील जागतिक स्तरावरील दिग्गज गोलंदाजांवर तुटून पडण्याची क्षमता राखून आहे. त्यामुळे, या जोडीला स्वस्तात रोखणे पाकिस्तानसाठी क्रमप्राप्त असेल. तिसऱया स्थानावरील मार्श उत्तम फॉर्ममध्ये आहे तर स्टीव्ह स्मिथचा अनुभव कांगारुंसाठी बलस्थान असेल. मॅक्सवेलला अद्याप सूर सापडला नसला तरी शेवटच्या पाच षटकात तो स्टोईनिस, मॅथ्यू वेड यांच्यासह जोरदार फटकेबाजी करु शकतो. या स्पर्धेत धावांचा पाठलाग करणारे बहुतांशी संघ जिंकत आले असून तोच ट्रेंड आजही कायम राहणार का, हे पहावे लागेल.
कोट्स
विजय किंवा पराभव कोणाच्याही हातात असत नाही. पण, पाकिस्तानचे खेळाडू बेधडक खेळत आहेत, म्हणूनच जिंकत आले आहेत. भारत, न्यूझीलंडविरुद्ध मोक्याच्या लढतीत संघाने ताकद दाखवली. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्यांच्याकडून हीच अपेक्षा असणार आहे.
-पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा
या विश्वचषक स्पर्धेतील सलामी लढतीत पाकिस्तानने भारताला चारीमुंडय़ा चीत केले आणि तोच त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्या विजयामुळे पाकिस्तानला स्फूरण चढले आणि म्हणूनच ते अद्याप अपराजित आहेत. आमच्या संघाला त्यांच्याविरुद्ध अनुभव पणाला लावावा लागेल.
-ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन
ऍरॉन फिंच म्हणतो, पॉवर प्लेमध्ये शाहिनविरुद्ध फलंदाजी महत्त्वाची ठरेल!
उंचापुऱया शाहिन आफ्रिदीने या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या स्पेलमध्येच सर्वाधिक भेदक मारा साकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन दिग्गज सलामीवीर ऍरॉन फिंचने पॉवर प्लेमध्ये शाहिनविरुद्ध फलंदाजी महत्त्वाची ठरेल, असे प्रतिपादन केले.
‘शाहीन या विश्वचषकातच उत्तम बहरात राहिला आहे. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही निकषावर पॉवर प्लेची 6 षटके विशेष महत्त्वाची असतात. मधली षटके व डेथ ओव्हर्समध्ये खेळ उंचावता येऊ शकतो. मात्र, पॉवर प्लेमध्ये खरी दिशा स्पष्ट होते’, असे फिंच पुढे म्हणाला. ऍडम झाम्पा व मॅक्सवेल यांनी उत्तम गोलंदाजी साकारली असून आजही त्यांच्याकडून आम्हाला बरीच अपेक्षा असेल, असे त्याने येथे स्पष्ट केले.









