वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
कर्णधार बाबर आझमचे शानदार शतक तसेच इमाम उल हकच्या अर्धशतकाच्या जोरावर पाक संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी देताना यजमान दक्षिण आफ्रिकेचा तीन गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन डेर डय़ुसेनचे नाबाद शतक वाया गेले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 6 बाद 273 धावा जमवित पाकला 274 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर पाकने 50 षटकांत 7 बाद 274 धावा जमवित हा सामना जिंकला. कर्णधार बाबर आझमला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात व्हॅन डेर डय़ुसेनने आपले पहिले शतक झळकविले. त्याने 134 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 123 धावा जमविल्या. मिलरने 56 चेंडूत 5 चौकारांसह 50, फैलुकेवायोने 35 चेंडूत 4 चौकारांसह 29, डिकॉकने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 20, मार्करेमने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. पाकतर्फे शाईन अफ्रिदीने 2, हॅरीस रॉफने 2 तर आश्रफ आणि हेसनेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझमने 104 चेंडूत 17 चौकारांसह 103 तर इमाम उल हकने 80 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 70 धावा झळकविल्या. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 177 धावांची भागिदारी केली. सलामीचा फक्र झमान 8 धावांवर त्रिफळाचीत झाला. मोहम्मद रिझवानने 52 चेंडूत 4 चौकारांसह 40, शदाब खानने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे फैलुकेवायोने 2, नॉजेने 4 तर रेबाडाने 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण गचाळ झाल्याने त्याने हा सामना गमवावा लागला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका- 50 षटकांत 6 बाद 273 (व्हॅन डेर डय़ुसेन नाबाद 123, मिलर 50, फैलुकेवायो 29, डिकॉक 20, मार्करेम 19, शाईन अफ्रिदी आणि हॅरीस रॉफ प्रत्येकी 2 बळी, आश्रफ आणि हेसनेन प्रत्येकी एक बळी)
पाक- 50 षटकांत 7 बाद 274 (बाबर आझम 103, इमाम उल हक 70, रिझवान 40, शदाब खान 33, नॉजे 4 बळी, फैलुकेवायो 2 बळी, रेबाडा 1 बळी).









