ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
‘टिकटॉक’ या चीनच्या लोकप्रिय ॲपवर पाकिस्तानने पुन्हा बंदी घातली आहे. या ॲपमुळे समाजात अश्लीलला पसरत असल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्यानंतर दोन सरकारी वकिलांमार्फत पेशावरच्या उच्च न्यायालयापुढे हा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घालण्याचा आदेश टेलिकॉम प्रशासनाला दिला.
जून 2020 मध्ये भारत आणि अमेरिकेने ‘टिकटॉक’वर बंदी घातली आहे. पाकिस्ताननेही ऑक्टोबर 2020 मध्ये या ॲपमुळे समाजात अश्लीलला पसरत असल्याच्या आरोप करत ॲपवर बंदी घातली होती. परंतु, ॲप कंपनीने अश्लील किंवा चुकीचे संदेश देणारे व्हिडिओ काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यामुळे अवघ्या 10 दिवसांच्या आत ती बंदी मागे घेण्यात आली होती.
मात्र, इम्रान सरकारकडे पुन्हा या ॲपमुळे अनैतिक गोष्टीला प्रोत्साहन मिळत असून, समाजात अश्लीलता पसरत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यावर सरकारच्या वतीने हा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार टिकटॉकचा ॲक्सेस ब्लॉक करण्याचे निर्देश सेवा पुरवठादारांना देण्यात आले.









