यंदा वृक्षांच्या संख्येत घट, वनविभागाला फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
वादळी पाऊस, रस्ते विकास आणि इतर कारणांमुळे यंदा झाडे नष्ट होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे झाडांच्या संख्येत घट होणार आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड झाली आहे. त्याबरोबर नवीन लावलेली रोपेही नष्ट झाली आहेत. त्यामुळे वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाला मोठा फटका बसला आहे.
दरवषी वनखाते आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत लाखो वृक्षांची लागवड केली जाते. शिवाय वृक्ष संवर्धनासाठी विविध उपाय हाती घेतले जातात. मात्र यंदा पावसामुळे खात्याने वृक्षांसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी वनक्षेत्राबरोबर रस्त्याच्या दुतर्फा सरकारी जागा, खुल्या जागा आणि इतर ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते. मागील जून, जुलै दरम्यान वन क्षेत्रात तब्बल 3 लाख नवीन रोपांची लागवड झाली आहे. तर ग्रामीण भागातील विविध मार्गावर 30 हजार रोपे लावली गेली आहेत. मात्र अतिपावसाचा फटका या रोपांना बसला आहे.
दरवषी विविध ठिकाणी रस्त्यांचा विकास साधला जातो. दरम्यान रस्त्याशेजारी असलेली झाडे हटविली जातात. त्यामुळे खात्याला तोटा सहन करावा लागतो. मागील चार वर्षात बेळगाव-खानापूर मार्गावर असलेल्या झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल झाली आहे. रस्ता विकासासाठी ही झाडे हटविण्यात आली आहेत. याबरोबरच इतर रस्त्यावरील आणि इतर ठिकाणीही झाडे हटविली जातात. शिवाय काही ठिकाणी बेकायदेशीर झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. यंदा शहराबरोबर ग्रामीण भागातील झाडे नष्ट झाल्याने वृक्षांची संख्या कमी होणार आहे.
वृक्ष संख्येत घट
विकासकामे आणि अतिपावसामुळे झाडांची संख्या यंदा कमी होणार आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे झाडे हटविण्यात आली आहेत. त्याबरोबर सध्या होत असलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली आहे. त्यामुळे यंदा वृक्षांच्या संख्येत लक्षणीय घट होणार आहे.
शिवानंद मगदूम (आरएफओ, शहर)
यंदा पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होणार आहे. मात्र जून, जुलै दरम्यान पुन्हा वृक्ष लागवड केली जाणार आहे. शहरातील झाडांची संख्या कमी झाली आहे. मात्र खुल्या आणि सरकारी जागेमध्ये झाडे लावली जाणार आहेत.









