पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम संकटात
प्रतिनिधी / कोल्हापूर
मोसमी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून माळरानावरील पिके कोमेजली आहेत. खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असताना आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या कालावधीत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे गेला पाऊस कुणीकडे… ? असा सवाल बळीराजाकडून उपस्थित केला जात आहे.
पर्जन्यस्थितीबाबत वेधशाळेलाही अचूक अंदाज वर्तविता आला नसल्यामुळे शेतकरी च्ंिातातूर बनला आहे. सध्या खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असली तरी पावसाअभावी ती कोमेजू लागली आहेत. खरिपामधील अंतरमशागतीला वेग आला असून शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या मान्सूनपूर्व पावसासह मृग नक्षत्रातही समाधानकारक पाऊस झाला. संपूर्ण आदार्क नक्षत्र आणि ‘पुनर्वसू’च्या पुर्वार्धात झालेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या खरीप पिकांची चांगली वाढ झाली आहे. पण पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱयांकडून विहीर आणि नदीवरील मोटरपंपाद्वारे संरक्षित पाणी देऊन पिके जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. गगनबावडा, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील तुरळक पाऊस वगळता शिरोळ, हातकणंगले, करवीरसह इतर तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे.
खरीप पिकांची 94 टक्के पेरणी पूर्ण
जिह्यात भात, ज्वारी, नागली, मका, इ.तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, सोयाबीन, कारळा, सुर्यफूल आदी खरीप पिकांची 94 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये भात पिकाची 96 टक्के पेरणी झाली असून खरीप ज्वारी, 87.74, नागली 93, मका 40, ई. तृणधान्ये 69, तूर 89, मूग 66, उडीद 88, भूईमूग 86, तीळ 42, सोयाबीन 108, कारळा 125, सुर्यफूल 100 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी झालेल्या या पिकांची चांगली उगवण झाली असली तरी सध्या पावसाअभावी पिके कोमेजली आहेत.
वेधशाळेचा अंदाज चुकतोय
मोसमी पाऊस सुरु झाल्यापासून वेधशाळेकडून वर्तवले जाणारे अंदाज चुकत आहेत. वेळोवेळी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरी त्या कालावधीत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शेतकऱयांनी वेधशाळेच्या अंदाजानुसार पिक नियोजन केले आहे. मात्र हा अंदाजच फोल ठरत असल्यामुळे शेतकऱयांना त्याचा फटका बसत आहे.








