भामटय़ाकडून क्लब रोडवर अनेकांना गंडा
प्रतिनिधी /बेळगाव
ड्रेनेजचे पाईप बदलायचे आहेत, असे सांगत नागरिकांना गंडविणारी टोळी सक्रिय झाली आहे. सोमवारी क्लब रोडवर या टोळीने करामत दाखविली आहे. या टोळीतील एकाची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आर्थिक फसवणुकीसाठी महानगरपालिकेचे नाव घेतले जात आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास क्लब रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱया विनोद नाईक यांच्या घरी एक व्यक्ती पोहोचली. आपण महानगरपालिकेतून आलो आहोत. तुमची डेनेज पाईपलाईन खराब झाली आहे. ती बदलावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला 8 हजार 500 रुपये भरावे लागणार आहे,असे त्या भामटय़ाने विनोद यांना सांगितले.
विनोद यांनी पाईप बदलण्याची तयारी दर्शविली. केवळ पाईप बदलणेच नव्हे तर यापुढे कचरा टाकण्यासाठी खाली येवू नका. तुम्हाला तीन डस्टबीन दिले जाईल. घरातील कचरा डस्टबीनमध्येच टाका, पालिकेचा कर्मचारी येवून कचरा घेवून जाईल, असे सांगत भामटय़ाने विश्वास संपादन केला. पैसे दिलात तर कार्यालयात भरुन येवून कामाला लागतो, असे सांगून भामटय़ाने पैशांची मागणी केली.
त्या भामटय़ासोबत विनोद यांनी आपल्या एका कामगाराला पाठविले. हे दोघे पैसे भरण्यासाठी विश्वेश्वरय्यानगर येथील एका कार्यालयासमोर पोहोचले. कार्यालयासमोर येताच कामगाराच्या हातातील पैसे भामटय़ांनी आपल्याकडे घेतले व तुम्ही येथेच थांबा मी पैसे भरुन येतो, असे सांगत त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.
डेनेज पाईप बदलण्याचे सांगून घर व फ्लॅट मालकांना गंडविणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीतील भामटय़ांनी क्लब रोडवर अनेकांना गंडविल्याचे उघडकीस आले आहे. भामटय़ाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर सातत्याने संपर्क साधला तरी तो बंद होता. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.









