विविध वसाहतींमधील रहिवाशांचे स्मार्ट सिटीला निवेदन
प्रतिनिधी/बेळगाव
विनायकनगर परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करून डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले. तसेच भूमीगत विद्युतवाहिन्या, डेनेजवाहिन्या, गॅसवाहिन्या घालून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मात्र या लगत असलेल्या शिवगिरी कॉलनी, सिंधी कॉलनी परिसरात सुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. भेदभाव न करता पाईपलाईन रोडशेजारील वसाहतींमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत संपूर्ण शहराचा विकास करण्यात येत आहे. याअंतर्गत विनायकनगर परिसरात विकासकामे राबविण्यात आली. मात्र शिवगिरी कॉलनी, सिंधी कॉलनी, टिचर्स कॉलनी, धन्वंतरी कॉलनी, जनता कॉलनी, विजयनगर पाईप लाईन रोड अशा विविध परिसरातील विकासाकडे कानाडोळा करण्यात आला आहे. काही भागात विद्युतवाहिन्या, डेनेजवाहिन्या आणि गॅसवाहिन्या घालून रहिवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी खर्च केला जात आहे. उत्तर मतदार संघात येणाऱया विनायकनगर परिसरातील जुने पथदीप काढून नवीन डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्याचे काम स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हनुमाननगर परिसरातील रस्त्याचा विकास करण्यात आला आहे.
मात्र ग्रामीण मतदार संघात मोडणाऱया पण महापालिका व्याप्तीमध्ये असलेल्या वसाहतींमध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. तर या परिसरातील खराब झालेले पथदीप हटवून डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. त्याचप्रमाणे उद्यानांचा विकास, रस्त्याची सुधारणा करणे गरजेचे आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन रोडवर मुख्य जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र या रस्त्याचा विकास करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
हा रस्ता महत्त्वाचा असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या परिसराचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवगिरी कॉलनी, सिंधी कॉलनी, रक्षक कॉलनी, धन्वंतरी कॉलनी, जनता कॉलनी अशा विविध परिसरातील रहिवाशांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे. महापालिकेने देखील याकडे लक्ष देऊन समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.









