वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्समधील नॅन्टेस येथे सुरू असलेल्या अलेक्सीज व्हॅसेटिन आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे मुष्टियोद्धे अमित पांघल, कविंदरसिंग बिस्त आणि संजीत यांनी आपल्या वजनगटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरुषांच्या 63 किलो वजनगटात भारताचा शिवा थापा याला उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. शिवा थापाने यापूर्वी आशियाई स्पर्धेत चार वेळा पदक पटकाविले होते. गुरुवारी झालेल्या 63 किलो वजनगटातील उपांत्य लढतीत फ्रान्सच्या हेमरोईने थापाचा 2-1 अशा गुणांनी पराभव केला. पुरुषांच्या 57 किलो वजनगटातील उपांत्य फेरीच्या लढतीत भारताच्या कविंदरसिंग बिस्तने फ्रान्सच्या मेल्कुमेनचा 3-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्याचा अंतिम सामना फ्रान्सच्या किस्टोहेरीशी होणार आहे.
पुरुषांच्या 91 किलो वजनगटातील उपांत्य फेरीच्या लढतीत भारताच्या संजीतने अमेरिकेच्या फुलगेमवर 2-1 अशा गुणांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. संजीतचा अंतिम सामना फ्रान्सच्या सोहेब बोफियाबरोबर होणार आहे. यापूर्वी झालेल्या इंडिया खुल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत संजीतने सुवर्णपदक पटकाविले होते. पुरुषांच्या 52 किलो वजनगटात अमित पांघलने उपांत्य लढतीत अमेरिकेच्या ख्रिस्टोफर हिरेराचा पराभव केला. गेल्या मार्चमध्ये ऑलिम्पिक पात्रतेसाठी जॉर्डनमध्ये झालेल्या स्पर्धेनंतर भारतीय मुष्टियोद्धे फ्रान्समधील या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग दर्शवित आहेत. मध्यंतरी जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.









