मुखवटय़ावर चोरटय़ाचा डल्ला, 10 मिनिटात केली चोरी, मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या घटनेने खळबळ

प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या काही दिवसांमध्ये चोरटय़ांनी मंदिरांमध्ये चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. सोमवारी गांधीनगर येथे जैन मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता मंगळवारी पहाटे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पांगुळ गल्लीतील जागृत देवस्थान अश्वत्थामा मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. चोरटय़ांनी केवळ 10 मिनिटात तीन किलोचा चांदीचा मुखवटा लांबविला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच भक्तांतून तीव्र संताप क्यक्त होत आहे.
पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरातील मूर्तीवर चांदीचा 3 किलोचा मुखवटा होता. तोच चोरटय़ांनी लांबविला आहे. नेहमीप्रमाणे स्वच्छता करण्यासाठी महिला तेथे आली. तिने व्हरांडय़ामध्ये झाडलोट करून स्वच्छता केली. तसेच पाठिमागील मारुती मंदिरात स्वच्छता करण्यासाठी गेली होती. त्यावेळी चोरटय़ांनी हीच संधी साधून हा मुखवटा लांबविला आहे. या घटनेनंतर त्या महिलेने या घटनेची माहिती तेथील काही नागरिकांना तसेच पंचांना सांगितली.
त्यानंतर सर्व जण घटनास्थळी दाखल झाले. तातडीने मार्केट पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. चोरटय़ांनी बूट तेथेच सोडून पलायन केले आहे.. या घटनेची नोंद मार्केट पोलीस स्थानकात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार
गेल्या काही दिवसांपासून शहरांतील विविध मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. ही टोळी मंदिरांनाच लक्ष्य बनवित असल्याचे बोलले जात आहे. चार दिवसांपूर्वी खडेबाजार येथील अंबाबाई मंदिरातही चोरी झाली आहे. त्यानंतर चोरटय़ांनी गांधीनगर येथील जैन मंदिरामधील दानपेटी व व आठ मूर्ती पळविल्या आहेत. ही घटना ताजी असतानाच पुन्हा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पांगुळ गल्लीत मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.
चोरटय़ाची छबी सीसीटीव्हीत कैद
पहाटेच्यावेळी ही चोरी झाल्यामुळे या परिसरात वर्दळ कमी होती. मात्र एक संशयित या परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्याने जीन पॅन्ट तसेच टिशर्ट परिधान केले आहे. मुखवटय़ाची चोरी करुन तो एका पिशवीतून घेऊन जातानाचे चित्र सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे पोलिसांना या संशयिताला अटक करणे सोपे जाणार आहे.









