प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील केम येथे एका तरुणाचा गजाने हल्ला करून खून करण्यात आला. महेश राजेंद्र शिंदे वय 32 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना पांगरे येथे उजनीच्या पाणी फुगवट्याजवळ घडली आहे.
केम (ता.करमाळा) येथील महेश राजेंद्र शिंदे (वय-32) हा मत्स्य व्यवसायिक होता. मासे पकडण्यासाठी आल्यानंतर त्याचा खून झाल्याचे समजते. त्याच्यावर गज व अन्य हत्याराने हल्ला करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
आज दि. 2 ऑगस्ट रोजी पहाटे महेशच्या भावाला या खूनाची माहिती मिळाली. याची माहिती पोलीसांत दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपविभागीय पोलीस प्रमुख डॉ. विशाल हिरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी डॉगस्क्वॉडला पाचारण करण्यात आले होते, तसेच ठसे तज्ञांनाही बोलावले होते.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सर्व माहिती घेऊन त्याबाबतचे संदर्भ दिले आहेत. आम्ही सर्व बाबींचा अभ्यास करून लवकरच आरोपीपर्यंत पोहोचत आहोत. योग्य धागे-दोरे शोधून आमची पथके योग्य ठिकाणी पाठवली आहेत. खुनी सापडतील व त्यामागचे कारण ही लवकरच समजेल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी दिली.









