प्रभारी नायब राज्यपालांची नारायणसामींना सूचना
पाँडिचेरी / वृत्तसंस्था
पाँडिचेरीत मुख्यमंत्री नारायणसामी यांच्या गटातील चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने आपले बहुमत गमावले आहे. 33 सदस्य असलेल्या पाँडिचेरी विधानसभेत आता काँग्रेसकडे केवळ 14 आमदार राहिले आहेत. नारायणसामी यांचे सरकार अल्पमतात आल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला असला तरी प्रभारी नायब राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांनी त्यांना येत्या सोमवारी, 22 फेब्रुवारी रोजी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. पाँडिचेरी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पाँडिचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना तात्काळ प्रभावाने हटवण्याचे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्यानंतर तेथील अतिरिक्त पदभार तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मागील काही काळापासून किरण बेदी आणि मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरु असणाऱया वादाचा परिणाम आता पाहायला मिळत आहे. नायब राज्यपालपदी कार्यरत असताना किरण बेदींचे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांच्याशी मोठय़ा प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते.









